आदिवासींच्या कुटुंबांत शिक्षणाचा प्रकाश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 01:23 IST2016-10-17T01:23:20+5:302016-10-17T01:23:20+5:30
आदिवासींमधील कातकरी समाजाच्या १८ कुटुंबांतील २१ मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे

आदिवासींच्या कुटुंबांत शिक्षणाचा प्रकाश
डेहणे : दारिद्र्य ज्यांच्या पाचवीला पूजलेले, आयुष्यालाही भरकटत नेणारी भटकंती साथीला जोडलेली, अशा आदिवासींमधील कातकरी समाजाच्या १८ कुटुंबांतील २१ मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.
डोंगराळ भागात कायम भटकंती करावी, गिलवरीने पक्षी मारावा नाही, तर कुठे रानपक्ष्यांची साकवं (अंडी ) मिळाली, तर ती खाऊन कुटुंबाची गुजराण करावी, असा भूमिहीन व कुठलाही रोजगार नसलेला कष्टकरी (कातकरी) समाज.
येथील पंधरा-वीस कुटुंबातील एकाही पिढीने शिक्षण घेतलेले नाही, किंबहुना शाळेचा उंबरठाही ओलांडला नाही. हलाखीची परिस्थिती व शिक्षण नसल्याने कमालीचे दारिद्र्य या कुटुंबात आहे.
कुठेतरी व केव्हा तरी मिळणारा तुटपुंजा रोजगार व एक वेळचे जेवण यावर दिवस काढणारी ही जमात २१ व्या शतकातही सर्वांगाने मागास राहिली आहे. त्यामुळे त्यांचा आर्थिक आणि शैक्षणिक असा कोणत्याच प्रकारचा विकास झाला नाही.
(वार्ताहर)
>इतर मुले शिक्षण घेताना बघून ही मुले ही शिकतील, अशी अपेक्षा ठेवली. ग्रामस्थांना त्यांनी केलेल्या सर्व प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. अक्षरओळखही नसलेल्या या कुटुंबातील एकवीस मुले व मुली ह्यवाचन प्रेरणा दिनी ह्यभरभर वाचताना दिसत होती.
या सगळ्या मुलांच्या आई-वडिलांना आपल्या समाजात आपली मुले कुटुंबात पहिल्यांदा शिकताहेत याचा अभिमान वाटतो आहे. या सगळ्या मुलांना गरज आहे ती समाजाच्या मदतीची, त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या हातांची. शाळेत शिक्षक प्रोत्साहन देत आहेत, उद्या या मुलांचे भविष्य चांगले व्हावे म्हणून शिक्षकही प्रयत्नशील आहेत.