जीवनशैलीत आयुर्वेद अंगीकारल्यास कर्करोग सुसह्य
By Admin | Updated: November 3, 2014 04:28 IST2014-11-03T04:28:25+5:302014-11-03T04:28:25+5:30
कर्करोगाचे निदान होताच काही जण घाबरून जातात. सुमारे ७० ते ८० टक्के रुग्णांचा कर्करोग हा बरा होऊ शकतो

जीवनशैलीत आयुर्वेद अंगीकारल्यास कर्करोग सुसह्य
मुंबई : कर्करोगाचे निदान होताच काही जण घाबरून जातात. सुमारे ७० ते ८० टक्के रुग्णांचा कर्करोग हा बरा होऊ शकतो. कर्करोगासाठी अॅलोपॅथीचे उपचार सुरू असतानाच त्याला आयुर्वेदाची जोड दिल्यास कर्करोग सुसह्य करणे सहज शक्य आहे. इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रिटमेंट अॅण्ड रिसर्च सेंटरमध्ये (आयसीटीआरसी) अशी हजारो उदाहरणे पाहायला मिळतात. जीवनशैलीत बदल करून आयुर्वेदाचा अंगीकार केल्यास आरोग्य सुधारते, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी आयसीटीआरसीच्या द्विदशकपूर्ती कार्यक्रमात व्यक्त केले.
कर्करोग संशोधन प्रकल्पाच्या द्विदशकपूर्तीनिमित्त कर्करोगासारख्या आजारावर भारतात वाजवी दरात उपलब्ध असलेल्या दर्जेदार आणि गुणकारी आयुर्वेदिक उपचारांची माहिती देण्यासाठी रविवारी दादरमधील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालातील सुरेंद्र गावसकर सभागृहात एक खास समारंभ पार पडला. या कार्यक्रमात आयसीटीआरसीचे संचालक डॉ. सदानंद सरदेशमुख, बॉम्बे रुग्णालयाच्या रेडिएशन आॅन्कॉलॉजीचे माजी विभागप्रमुख डॉ. अरविंद कुलकर्णी, सर्जिकल आॅन्कॉलॉजिस्ट डॉ. अनिल संगानेरिया आणि डॉ. विनीता देशमुख (आयुर्वेद) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
या वेळी डॉ. सरदेशमुख म्हणाले, कर्करोग बरा करतो असे आमचे म्हणणे नाही, दावा नाही. पण या रुग्णांची जीवनशैली सुखकर होऊ शकते. कर्करोगाचे नाव ऐकल्यावर अनेकांचा थरकाप उडतो. कर्करोगाचे निदान होताच आयुष्य संपले, अशीच मानसिकता बनते. कर्करोग झालेला रुग्णदेखील आरोग्यदायी आयुष्य जगू शकतो. आयुर्वेदाप्रमाणे जीवनशैलीत केलेले बदल फायदेशीर ठरतात.
डॉ. अरविंद कुलकर्णी म्हणाले की, कर्करोग हा कोणत्याही प्रकारच्या बाह्य विषाणूंमुळे होत नाही. शरीरातील पेशींची अनियंत्रित वाढ होऊन, त्या दुसऱ्या अवयवांमध्ये पसरल्याने कर्करोग होतो. अशा वेळी जीवनशैलीत बदल केल्यास कर्करोगावर नियंत्रण मिळवता येते. त्यासाठी आहार, विहार, वर्तणूक, विचार या गोष्टींमध्ये बदल करणे अत्यावश्यक आहे. आयुर्वेदाचा समावेश असलेली जीवनशैली अंगीकारल्यास आरोग्यदायी आयुष्य जगता येते.
कर्करोगाचे निदान लवकर झाल्यास तो बरा होण्याची शक्यता वाढते. काही वर्षांपूर्वी कर्करोगाच्या शस्त्रक्रिया खूप व्हायच्या. मात्र आता नव्या तंत्रज्ञानामुळे कर्करोगाची शस्त्रक्रिया सुलभ बनली असल्याचे डॉ. अनिल संगानेरिया यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला डॉ. श्रीनिवास दातार, डॉ. प्रज्ञा उमाळे, डॉ. साबीर मुजावर, डॉ. वासंती गोडसे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)