मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याची जन्मठेप कायम
By Admin | Updated: April 13, 2015 04:44 IST2015-04-13T04:44:12+5:302015-04-13T04:44:12+5:30
स्वत:च्याच मुलीवर सतत दोन वर्षे बलात्कार करणाऱ्या किसन सूरजमल गेहलोत या ४३ वर्षांच्या नराधम पित्याला सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने अपिलातही कायम केली.

मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याची जन्मठेप कायम
मुंबई : स्वत:च्याच मुलीवर सतत दोन वर्षे बलात्कार करणाऱ्या किसन सूरजमल गेहलोत या ४३ वर्षांच्या नराधम पित्याला सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने अपिलातही कायम केली.
आनंदीबाई चाळ, जिजामाता स्कूलसमोर, कुरार गाव, मालाड (प.) येथे राहणाऱ्या किसनला सत्र न्यायालयाने सप्टेंबर २००४ रोजी जन्मठेप ठोठावली होती. त्याविरुद्ध किसनने नऊ वर्षांच्या विलंबाने केलेले अपील न्या. पी. व्ही. हरदास व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने फेटाळले. सत्र न्यायालयाने सर्व साक्षीपुराव्यांचा साकल्याने विचार करून किसनला ठोठावलेली शिक्षा योग्यच आहे. आरोपीने केलेल्या गुन्ह्याचे स्वरूप पाहता त्याला जराही दया दाखविता येणार नाही, असे खंडपीठाने नमूद केले.
सूरजने सप्टेंबर २००१ ते २००३ या काळात स्वत:च्याच मुलीवर राहत्या घरात सतत बलात्कार केले होते. १६ सप्टेंबर २००३ रोजी सकाळी या मुलीने हा प्रकार सर्वप्रथम आपला भाऊ प्रमोद व काका कांतीलाल यांना सांगितला. ते दोघे तिला घेऊन कुरार पोलीस ठाण्यात गेले व तिने फिर्याद नोंदविल्यावर किसनला अटक झाली.
पित्याने दम दिल्याने व बभ्रा केला तर आपलीही अभ्रू चव्हाट्यावर येईल या भीतीने ही मुलगी जन्मदात्याकडूनच केले जाणारे हे अत्याचार दोन वर्षे निमूटपणे सोसत राहिली. मात्र १६ एप्रिल २००३ रोजी नराधम बापाने अमानुषतेचा कळस गाठला. धाकटा भाऊ सकाळी ६.३० वाजता शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडताच किसनने मुलीवर बलात्कार केला, पण तिची मासिक पाळी चालू आहे, याची पर्वाही त्याने केली नाही. बरे वाटत नाही म्हणून शाळेत गेलेला भाऊ थोड्याच वेळात परत आला रडणाऱ्या बहिणीकडे त्याने चौकशी केली तेव्हा झाला प्रकार उघड झाला.
विशेष असे की, ज्या घरात किसनने हा किळसवाणा प्रकार केला ते एका खोलीचे असून, मध्ये पार्टिशन घातलेले आहे.
पार्टिशनच्या पलीकडे दुसरे कुटुंब राहते. (विशेष प्रतिनिधी)