पत्नीस जाळणाऱ्या पतीस जन्मठेप

By Admin | Updated: December 31, 2014 01:03 IST2014-12-31T01:03:28+5:302014-12-31T01:03:28+5:30

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा जाळून खून करणाऱ्या एका पतीला आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

Life saving husband's wife | पत्नीस जाळणाऱ्या पतीस जन्मठेप

पत्नीस जाळणाऱ्या पतीस जन्मठेप

चारित्र्यावर संशय : बुटीबोरीतील घटना
नागपूर : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा जाळून खून करणाऱ्या एका पतीला आज अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
कैलास पांडुरंग येडमेवार (३५), असे आरोपीचे नाव असून गुन्ह्याच्या वेळी तो एमआयडीसी बुटीबोरी येथे सुरक्षा जवान म्हणून नोकरीस होता. शुभांगी येडमेवार (३१), असे मृत महिलेचे नाव होते. ही घटना २९ मार्च २०१३ रोजी बुटीबोरी येथे घडली होती.
शुभांगी ही मूळ नागपूरची होती तर कैलास हा पांढरकवडानजीकच्या किन्ही येथील मूळ रहिवासी होता. या दोघांचा विवाह २००२ मध्ये पार पडला होता. त्यांना वैष्णवी नावाची सात वर्षांची मुलगी आहे. लग्न झाल्यापासूनच कैलास हा चारित्र्यावर संशय घेऊन शुभांगीला मारहाण करायचा. त्यांच्यात सतत भांडणे व्हायची. शुभांगी ही सासू-सासऱ्यासोबत बुटीबोरी शिक्षक कॉलनी येथे राहायची तेव्हाही तिचा सासू-सासऱ्याकडून मानसिक व शारीरिक छळ होत होता. त्यामुळे ती पती व मुलीला घेऊन बुटीबोरी येथे भाड्याने राहत होती. सासरकडून होणाऱ्या छळाची तक्रार तिने नागपुरात महिला सेलकडे केली होती.
घटनेच्या दिवशी २९ मार्च रोजी कैलासची सासू त्याच्या घरी आली होती. त्यामुळे तो संतप्त झाला होता. सासूवरून त्याने शुभांगीसोबत जोरदार भांडण केले होते. तिला स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतण्यास सांगितले होते. तिने अंगावर रॉकेल ओतले असता त्याने माचीसची काडी उगाळून तिला जाळले होते. शेजाऱ्यांनी तिला मेडिकल कॉलेज इस्पितळात दाखल केले असता ३० मार्च २०१३ रोजी तिचा मृत्यू झाला होता. शुभांगीचा नातेवाईक प्रेमलाल मंगल वाकमवार याच्या तक्रारीवरून बुटीबोरी पोलिसांनी भादंविच्या ४९८ अ, ३०२ कलमान्वये गुन्हा दाखल करून कैलासला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन कैलासला भादंविच्या ३०२ कलमांतर्गत जन्मठेप, २००० रुपये दंड, भादंविच्या ४९८ अ कलमांतर्गत १ वर्ष कारावास ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यास आली. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील राम अनवाणे, प्रशांत भांडेकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Life saving husband's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.