जीवनदायीच्या औषध पुरवठादाराची बिले थकीत
By Admin | Updated: May 22, 2014 05:20 IST2014-05-22T05:20:51+5:302014-05-22T05:20:51+5:30
राज्यातील गोरगरीब रु ग्णांना दर्जेदार उपचार देण्याचे स्वप्न दाखविणारी ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आॅक्सिजनवर आहे.

जीवनदायीच्या औषध पुरवठादाराची बिले थकीत
सुमेध वाघमारे, नागपूर - राज्यातील गोरगरीब रु ग्णांना दर्जेदार उपचार देण्याचे स्वप्न दाखविणारी ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ सुपर स्पेशालिटी रुग्णालयात आॅक्सिजनवर आहे. बिले थकल्याने पुरवठादाराने औषध देणे बंद केले आहे. रुग्णालयाच्या दरकरारावरही शस्त्रक्रियांना लागणारी औषधे व साहित्य नाही. यामुळे मागील दीड महिन्यापासून हृदयावरील शस्त्रक्रिया बंद पडल्या आहेत. विशेष म्हणजे, सुपरच्या या योजनेतील २५० क्लेमला मंजुरी मिळाली आहे. यातून १ कोटी ४८ लाख ७७ हजार रुपये रुग्णालयाच्या तिजोरीत जमा झाले आहे; असे असताना औषध पुरठादाराचे थकीत असलेले ९३ लाख रुपये न देता रुग्णांना वेठीस धरण्यात येत आहे. या योजनेतील लाभार्थी रेखा राजेश भुजाडे (४२) हिला वेळेवर ‘पेसमेकर’ उपलब्ध करून देण्यात आले नाही. यामुळे तिचा मृत्यू झाला. त्यानंतरही या रुग्णालयाची स्थिती सुधारलेली नाही. दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने प्रायोगिक तत्त्वावर आठ जिल्ह्णांत राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू केली. या योजनेला पहिल्या टप्प्यात चांगले यश मिळाले. त्यामुळे ही योजना २१ नोव्हेंबर २०१३ पासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात आली. या योजनेत ९२७ आजारांचा समावेश आहे. यासाठी तीन शासकीय रुग्णालयांसह ३२ खासगी रुग्णालयांमध्ये ही योजना सुरू झाली. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, २१ नोव्हेंबर २०१३ ते आतापर्यंत या रुग्णालयातून ८७१ केसेस आल्या आहेत. यातील २५० क्लेमला मंजुरी मिळाली आहे. उर्वरित केसेसमधील काही नामंजूर, डॉक्टरांच्या स्तरावर प्रलंबित व काही विमा कंपन्यांच्या प्रक्रियेत आहेत. मंजूर झालेल्या क्लेमधून सुपर स्पेशालिटी रुग्णालयाला १ कोटी ४८ लाख ७७ हजार रुपये मिळाले. यातील २५ लाख रुपये औषधे व साहित्य पुरवठा करणार्या ‘मेडिकल स्टुडन्ट कन्झुमर को-आॅप. सोसायटी’ला देण्यात आले. परंतु सोसायटीचे ९३ लाख रुपये अद्यापही सुपरकडे प्रलंबित होते. परिणामी सोसायटीने १ एप्रिलपासून औषध पुरवठा बंद केला. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वंदना अग्रवाल यांना ‘जीवनदायी’च्या संदर्भात विचारल्यावर त्यांनी उन्हाळी सुट्यांवर असल्याचे कारण सांगितले. कुणाकडे चार्ज दिला, याची माहिती दिली नाही.