क्षुल्लक कारणावरून पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप
By Admin | Updated: July 12, 2016 21:44 IST2016-07-12T21:44:01+5:302016-07-12T21:44:01+5:30
चहामध्ये केस निघाल्याच्या कारणावरून पत्नीचा खून करणारा शिवाजी निर्मळ याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

क्षुल्लक कारणावरून पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप
ऑनलाइन लोकमत
औरंगाबाद, दि. 12 - चहामध्ये केस निघाल्याच्या कारणावरून पत्नीचा खून करणारा शिवाजी निर्मळ याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश यु. एल. तेलगावकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
१६ मार्च २००३ ला शिवाजी निर्मळ (५०, रा. थेरगाव, ता. पैठण) हा पत्नी इंदूबाईसह जावई कृष्णा काळे यांच्याकडे राहण्यासाठी गेला होता. सायंकाळी शिवाजीने पत्नीस चहा मागितला. इंदूबाईने शिवाजीला चहा दिला. मात्र चहामध्ये केस निघाला. या कारणावरून वाद होऊन शिवाजीने काठीने इंदूबाईच्या डोक्यात मारून तिला गंभीर जखमी केले. त्यानंतर बेशुद्ध पडलेल्या पत्नीला पाठीवर टाकून तिला जावई काळे यांच्या शेतातील वस्तीवरील घरात नेले. तेथे पत्नीला तुरीच्या भुशात टाकले. मात्र ती जिवंत असल्याचे वाटल्याने शिवाजीने घरात पडलेल्या फावड्याने तिच्या डोक्यावर घाव घातले व फावड्याच्या दांड्याने तिला मारहाण केली. ती मरण पावल्याची खात्री पटल्यावर शिवाजीने मृतदेह घरापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका नांगरलेल्या शेतात पुरला.
या घटनेनंतर १९ मार्च २००३ रोजी शिवाजीने फुलंब्री पोलीस ठाणे गाठून पत्नीला स्वत: मारल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध भा.दं.वि.कलम ३०२ व २०१ (पुरावा नष्ट करणे) अन्वये गुन्हा दाखल केला. तत्कालीन तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक पी. एच. अंकुशकर यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक सरकारी वकील उदय पांडे यांनी १३ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. न्यायालयाने शिवाजीला कलम ३०२ खाली जन्मठेप व एक हजार रुपये दंड तसेच कलम २०१ खाली ३ वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड ठोठावला.