हवालदाराची हत्या करणाऱ्यास जन्मठेप
By Admin | Updated: March 1, 2017 05:50 IST2017-03-01T05:50:45+5:302017-03-01T05:50:45+5:30
हत्येप्रकरणी मंगळवारी सत्र न्यायालयाने आरोपी संतोष साळवे याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

हवालदाराची हत्या करणाऱ्यास जन्मठेप
मुंबई : कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार अजय गावंड यांच्या हत्येप्रकरणी मंगळवारी सत्र न्यायालयाने आरोपी संतोष साळवे याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. हा खटला आठ महिन्यांत संपवण्यात सरकारी वकिलांना यश आले.
न्या. एम. डी. देशपांडे यांनी संतोष साळवेला हत्या, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि घरात घुसखोरी करणे इत्यादी गुन्ह्यांतर्गत दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
‘कर्तव्यावर असलेले पोलीस हे कायद्याचे प्रतीक आहे. त्यामुळे त्यांच्यावर करण्यात आलेला हल्ला अतिशय गांभीर्याने घेऊन आरोपीला कठोर शिक्षा द्यावी,’ अशी मागणी विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी न्यायालयाला केली.
सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, १५ नोव्हेंबर रोजी अजय गावंड डोंगरी पोलीस ठाण्यात रात्रपाळीसाठी कर्तव्यावर होते. रात्री अडीचच्या सुमारास त्यांना वाडीबंदर येथील पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा फोन आला. त्याने एका चोराने सुविधा केंद्राच्या इमारतीत दबा धरल्याचे सांगितले. त्यामुळे गावंड यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. चोर इमारतीच्या गच्चीवर लपून बसला होता. त्याने आतून गच्चीचे दार लावून घेतले होते.
गावंड यांनी त्याला आपण पोलीस असल्याचे सांगत शरण येण्यास सांगितले. अनेकवेळा सांगूनही साळवेने गच्चीचा दरवाजा न उघडल्याने गावंड मागील बाजूने गच्चीवर उतरले. त्या वेळी साळवेने त्यांच्यावर लाकडी फळीने प्रहार केले. या हल्ल्यामुळे गावंड यांचा जागीच मृत्यू झाला. (प्रतिनिधी)
>