मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत स्वत:पेटवून घेत संपविले आयुष्य
By Admin | Updated: June 18, 2017 21:00 IST2017-06-18T20:53:34+5:302017-06-18T21:00:28+5:30
नाशिकमधील जेलरोड भागातील एका इसमाने अत्यंत विचित्र पध्दतीने स्वत:चे आयुष्य संपविल्याची घटना घडली आहे. त्याने हातांच्या नस कापून परिसरातील एका मंदिराभोवती जाऊन रक्तबंबाळ अवस्थेत प्रदक्षिणा घातल्या

मंदिराभोवती प्रदक्षिणा घालत स्वत:पेटवून घेत संपविले आयुष्य
नाशिक : पंधरा वर्षांपासून घरातून निघून गेलेल्या आणि पाच महिन्यांपुर्वीच पुन्हा घरी परतलेल्या नाशिकमधील जेलरोड भागातील एका इसमाने अत्यंत विचित्र पध्दतीने स्वत:चे आयुष्य संपविल्याची घटना घडली आहे. त्याने हातांच्या नस कापून परिसरातील एका मंदिराभोवती जाऊन रक्तबंबाळ अवस्थेत प्रदक्षिणा घातल्या आणि स्वत:ला पेटवून घेतले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेत ५९ वर्षीय मानसिक विकृ तीने ग्रासलेल्या इसमाचा मृत्यू झाला आहे. सदर घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने पोलिसांनी उशीरा सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सदर इसम हा मानसिक विकृत असल्याची बाब तपासात प्रथमदर्शनी समोर आली आहे. हा इसम भोंदूगिरी करणाऱ्या काही बुवाबाबांच्याही संपकर् ात होता असा संशयही पोलिसांना आहे. यामुळे अशा काही तरी अंधश्रध्देपोटी इसमाने स्वत:च्या हातांच्या नस कापून पेटवून घेत आत्महत्त्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जेलरोड परिसरातील मॉडेल कॉलनी येथील सुभाष रामराव डोईफोडे असे या मयत इसमाचे नाव आहे. पहाटे पाच वाजेच्या दरम्यान राहत्या घरात अंगावर स्वत: रॉकेल टाकले आणि इमारतीच्या मजल्यावरून या अवस्थेत खाली उतरून शेजारी असलेल्या एका मंदिराबाहेर पोहचला. त्याचवेळी डोईफोडे याने ब्लेडच्या सहाय्याने दोन्ही हातांच्या नस कापून घेतल्या. हातांमधून रक्त पडू लागले त्याच अवस्थेत त्याने मंदिराभोवती प्रदक्षिणाही मारल्या व स्वत: ला पेटवून घेतले. अचानकपणे मंदिराच्या आवारात आग दिसू लागल्याने परिसरातील नागरिक धावून बाहेर आले; मात्र आग मोठी असल्याने कोणीही त्यांच्याजवळ जाण्याचे धाडस केले नाही. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सदर घटनेची परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती. या घटनेमुळे संपुर्ण शहर हादरून गेले आहे. अशा विचित्र पध्दतीने या इसमाने स्वत:चे आयुष्य संपविल्याने हळहळबरोबरच आश्चर्यही व्यक्त होत आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.