पाणी पाणी करीत वृद्धेने त्यागला प्राण
By Admin | Updated: June 13, 2014 01:26 IST2014-06-13T01:26:24+5:302014-06-13T01:26:24+5:30
वय वर्ष ७०. शरीर थकलेले. अंगात त्राण नाही. मुलगी आणि जावयाने जग सोडले. नातच तेवढी आधाराला. याच नातीच्या भविष्यासाठी धडपड. मोलमजुरी करून नातीचे भविष्य घडवित होती.

पाणी पाणी करीत वृद्धेने त्यागला प्राण
भावना झाली पोरकी : नातीच्या भविष्यासाठी सुरू होती धडपड
किशोर वंजारी - नेर (यवतमाळ)
वय वर्ष ७०. शरीर थकलेले. अंगात त्राण नाही. मुलगी आणि जावयाने जग सोडले. नातच तेवढी आधाराला. याच नातीच्या भविष्यासाठी धडपड. मोलमजुरी करून नातीचे भविष्य घडवित होती. मात्र नियतीलाही ते मान्य नव्हते. उन्हाच्या तडाख्यात शेतात काम करताना पाणी पाणी करीत आजीने प्राण त्यागला अन् नात पोरकी झाली.
पंचफुला सदाशिव वैद्य रा. चिखली कान्होबा ता. नेर असे त्या आजीचे नाव. मुलगी आणि जावयाच्या मृत्यूनंतर दहा वर्षाच्या नातीसाठी आजी अंगात बळ आणून मिळेल ते काम करीत होती. बुधवारी नेहमीप्रमाणे ती एका शेतात कामासाठी गेली. सरपण गोळा करीत असताना उन्हाच्या तडाख्याने जीवाची लाहीलाही झाली. पाण्याचा शोध घेऊ लागली. मात्र पाणीच दिसत नव्हते. पाणी पाणी करीतच तिला भोवळ आली आणि खाली कोसळली. मृत्यू तिच्या डोळ्यात दिसत होता. मात्र नातीला बघितल्याशिवाय प्राण जात नव्हता. इकडे आजी घरी आली नाही म्हणून नात घाबरली. शेजाऱ्याला घेऊन शोध सुरू केला. एका शेतात पंचफुलाबाई जमिनीवर पडलेली दिसली. त्याच स्थितीत घरी आणले. अंगावर पाण्याचा शिडकावा केला. डोळे किलकिले झाले. नातीला डोळे भरुन पाहिले आणि क्षणात आजीने प्राण त्यागला. चिखली कान्होबा येथे घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला.
सात वर्षांपूर्वी पंचफुलाबाईच्या जावयाचे निधन झाले. त्या पाठोपाठ दोन वर्षाने मुलीनेही जग सोडले. या दाम्पत्याची भावना नावाची चिमुकली अनाथ झाली. मात्र मुलगी आणि जावयाच्यानंतर आजी पंचफुलाबाईने तिचा सांभाळ केला. भावनाचे शिक्षण होऊ दे, तिचे चांगले झाल्यानंतरच देवा मला उचल अशी पंचफुलाबाई नेहमी म्हणत होती. काठीचा आधार घेत थकलेल्या शरीराने नातीसाठी काबाड कष्ट उपसत होती. मात्र नियतीलाही हे मान्य नव्हते. पंचफुलाबाईचाही उन्हाच्या तडाख्यात पाणी पाणी करीत प्राण गेला आणि नात भावना अनाथ झाली.