एलआयसीचे अधिकारी संशयाच्या घेर्यात
By Admin | Updated: May 11, 2014 00:06 IST2014-05-10T22:07:58+5:302014-05-11T00:06:45+5:30
केंद्र सरकारची जनश्री विमा योजना एलआयसीच्या माध्यमातून राबविण्यात येते. यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थांनी या योजनेंतर्गत आलेल्या शिष्यवृत्तीच्या पैशाचा भ्रष्टाचार केला आहे.

एलआयसीचे अधिकारी संशयाच्या घेर्यात
जनश्री विमा योजना भ्रष्टाचार प्रकरण : आंदोलनाचा इशारा
नागपूर : केंद्र सरकारची जनश्री विमा योजना एलआयसीच्या माध्यमातून राबविण्यात येते. यासाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्थांनी या योजनेंतर्गत आलेल्या शिष्यवृत्तीच्या पैशाचा भ्रष्टाचार केला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखेत चौकशी सुरू असून, यात आठ संस्था बनावट आढळल्या आहे. या संस्थांवर कारवाई करण्यासाठी गुन्हे शाखेने एलआयसीला १ महिन्यापूर्वी पत्र पाठविले होते. मात्र एलआयसीकडून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने, या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एलआयसीच्या अधिकार्यांचे दोषींना पाठबळ मिळत असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते राजू भुंजे यांनी केला.
९ ते १२ वर्गात शिकणार्या विद्यार्थ्यांना जनश्री विमा योजनेंतर्गत वर्षाला १२०० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. या योजनेसाठी नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या एस. बी. बहुउद्देशीय महिला मंडळ, किरण बहुउद्देशीय महिला मंडळ, सुसंस्कार बहुउद्देशीय महिला मंडळ, महाराष्ट्र राज्य महिला संस्था, केअर कल्चरल असोसिएशन फॉर रुरल एज्युकेशन व पराते एज्युकेशन सोसायटी यांच्या मार्फत करोडो रुपयांची अफरातफर करण्यात आली आहे. या संस्था चंद्रशेखर भिसीकर नावाच्या व्यक्तीच्या असून, या संस्थेतील पदाधिकारी बनावट असल्याचे गुन्हे शाखेच्या चौकशीत आढळले आहे. याप्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी गुन्हे शाखेने २६ मार्च २०१४ ला एलआयसीला सहकार्याचे पत्र पाठविले. मात्र एलआयसीने कुठलेही गांभीर्य दाखविले नाही. या प्रकरणाची चौकशी दोन महिन्यात करावी, अशी मागणी राजू भुंजे यांनी पत्रकार परिषदेत केली. अन्यथा संविधान चौकात आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.