नागपूरच्या लेझिम पथकाने ‘राजपथ’ जिंकले
By Admin | Updated: January 30, 2015 00:59 IST2015-01-30T00:59:40+5:302015-01-30T00:59:40+5:30
नागपूर शहराचा कायापालट करण्यासाठी योजना तयार करण्यात येत आहे. हे शहर ‘मेट्रो सिटी’ करण्यासाठी प्रयत्न असताना सांस्कृतिक क्षेत्रातही उत्साहाचे वातावरण आहे.

नागपूरच्या लेझिम पथकाने ‘राजपथ’ जिंकले
राष्ट्रीय स्तरावरचा प्रोत्साहन पुरस्कार : नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
नागपूर : नागपूर शहराचा कायापालट करण्यासाठी योजना तयार करण्यात येत आहे. हे शहर ‘मेट्रो सिटी’ करण्यासाठी प्रयत्न असताना सांस्कृतिक क्षेत्रातही उत्साहाचे वातावरण आहे. नागरी सोयींसह कुठल्याही शहराची ओळख त्याच्या सांस्कृतिक वातावरणाने होत असते. समृद्ध सांस्कृतिक संचित असलेल्या शहराच्या शिरपेचात यंदाच्या गणतंत्र दिन परेडमध्ये मानाचा तुरा खोवला गेला आहे. नागपूरकर कलावंतांनी सादर केलेल्या ‘लेझिम पथकाला’ राष्ट्रीय स्तरावरील प्रोत्साहन पुरस्कार मिळाल्याने नागपूरकरांनी आनंद व्यक्त केला आहे. राजपथावर आर. डी. परेडमध्ये सादर केलेल्या या लेझिम नृत्याने देशवासीयांची मने जिंकली आहे.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या उपक्रमांतर्गत महानगरपालिका आणि काही खाजगी शाळांच्या एकूण १६० विद्यार्थ्यांनी परिश्रमाने लेझिम नृत्याचे उत्कृष्ट सादरीकरण करुन देशवासीयांसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही जिंकले. एकूण २० शाळांतील विद्यार्थ्यांची निवड या नृत्यासाठी करण्यात आली. यासाठी या विद्यार्थ्यांनी तब्बल पाच महिन्यांची तालिम केली होती. केंद्रातर्फे विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी मोठी प्रक्रिया राबविण्यात आली. यातून नृत्याचे ज्ञान असणाऱ्या १६० विद्यार्थ्यांची निवड केंद्रातर्फे करण्यात आली. निवडण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनी डिंसेंबर महिन्यात काँग्रेसनगर येथील होम गार्ड प्रांगणात महिनाभर नृत्याची तालिम केली. त्यानंतर या लेझिम पथकाला गणतंत्र दिन परेडसाठी ३ जानेवारी रोजी दिल्ली येथे रवाना करण्यात आले. २२ जानेवारीपर्यंत १६० विद्यार्थ्यांनी नियमित सराव केला. त्यानंतर २४ जानेवारी रोजी नृत्यासाठी लागणाऱ्या वेशभूषेसह नृत्याची रंगीत तालिम घेण्यात आली.
जंगी स्वागत होणार
२६ जानेवारीला राजपथावर विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य सादर केले आणि सर्वांनीच या नृत्याची प्रशंसा केली. नृत्य चांगले आणि शिस्तबद्धतेने सादर केल्याचे समाधान केंद्र अधिकारी आणि विद्यार्थ्यांना होतेच. पण या नृत्याला राष्ट्रीय स्तरावर पारितोषिक लाभल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला. अद्याप हे विद्यार्थी कलावंत नागपुरात पोहोचले नाहीत. शुक्रवारी सायंकाळी हे सर्व यशस्वी विद्यार्थी कलावंत नागपुरात पोहोचणार आहेत आणि त्यांचे जंगी स्वागत नागपूरकरांतर्फे करण्यात येणार आहे.
नागपूरच्या लेझिम पथकाने ओबामा यांना इतके प्रभावित केले की ‘व्हाईट हाऊस’च्या संकेतस्थळावर त्यांच्या निर्देशांनुसार या परेडचा हा फोटो ‘अपलोड’ करण्यात आला आहे. ‘फोटो आॅफ द डे’ असाही या फोटोचा उल्लेख करण्यात आला आहे. हे लेझिम नृत्य बसविण्यासाठी प्रसिद्ध कोरिओग्राफर शेलार यांनी परिश्रम घेतले. शेलार यांनी अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी कोरिओग्राफी केली आहे. कलावंत निवडण्याचे कामही त्यांनीच केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी जिद्दीने या नृत्यात जीव ओतला आणि यश खेचून आणले. दिल्ली येथे केंद्राचे अधिकारी प्रेमस्वरूप तिवारी, सतीश वानखेडे आणि कोरिओग्राफर शेलार गेले आहेत. याप्रसंगी प्रेमस्वरूप तिवारी म्हणाले, विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे गेल्यावर तेथल्या वातावरणाशी जुळवून घेत परिश्रम घेतले आणि सातत्याने गांभीर्याने सराव केला.