म्हाडाचे दीड वर्षाने विजेत्यांना पत्र
By Admin | Updated: October 8, 2015 03:15 IST2015-10-08T03:15:06+5:302015-10-08T03:15:06+5:30
म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत दीड वर्षांपुर्वी काढण्यात आलेल्या लॉटरीतील विजेत्यांना तब्बल दीड वर्षांनंतर प्रथम सूचना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे विजेत्यांना

म्हाडाचे दीड वर्षाने विजेत्यांना पत्र
मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत दीड वर्षांपुर्वी काढण्यात आलेल्या लॉटरीतील विजेत्यांना तब्बल दीड वर्षांनंतर प्रथम सूचना पत्र पाठविण्यात आले आहे. त्यामुळे विजेत्यांना दिलासा मिळाला असून विजेत्यांना कागदपत्रे जमा करण्यासाठी महिनाभराचा कालावधी देण्यात आला आहे.
कोकण मंडळाने विरार-बोळिंज येथील १ हजार ७१६ घरांची लॉटरी जुलै २0१४ मध्ये काढली होती. या लॉटरीत अल्प व मध्यम उत्पन्न गटातील घरांसाठी हजारो अर्ज आले होते. मोठ्या संख्येने असलेल्या अर्जांमधून विजेत्या ठरलेल्या विजेत्यांना हक्काचे घर मिळाल्याचा आनंद झाला होता. पण मंडळाकडून तब्बल दीड वर्ष उलटले तरी विजेत्यांना कोणतेही पत्र पाठविण्यात आले नव्हते. त्यामुळे विजेत्यांकडून नाराजी व्यक्त होत होती. तसेच आपल्याला घराचा ताबा कधी मिळणार याबाबत विजेत्यांना चिंता होती.
दरम्यान, विजेत्यांनी कागदपत्रे जमा केल्यानंतर डिसेंबरपर्यंत पात्रता निश्चिती करण्यात येणार असल्याचे म्हाडा अधिकाऱ्याने सांगितले. छाननीनंतर अपात्र ठरणाऱ्यांची तातडीने सुनावणी करण्यात येईल. तसेच पात्र ठरणाऱ्यांची पैसे भरण्याची पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
मंडळामध्ये असलेला अपुरा कर्मचारी वर्ग आणि इमारतीचे बांधकाम पूर्ण न झाल्याने म्हाडाने विजेत्यांना प्रथम सुचना पत्र पाठविले नव्हते. अखेर इमारतींचे काम वेगाने सुरु असल्याने म्हाडाने विजेत्यांना प्रथम सुचना पत्र पाठविले आहे. विजेत्यांना कागदपत्रे जमा करण्यासाठी महिन्याभराची मुदत दिली आहे.