होऊ दे चर्चा...

By Admin | Updated: October 11, 2014 05:48 IST2014-10-11T05:48:31+5:302014-10-11T05:48:31+5:30

या हॅन्डसेटला काय झालंय बघा. पूर्वीच्या मोबाईलवर ‘घड्याळाचा डिस्प्ले’ नीट दिसत नव्हता म्हणून बदलला, तर आता याच्या रिंंगटोनमधून बघावं तेव्हा ‘बबन... कमळ बघ!’ अस्साच आवाज येतोय.

Let's talk ... | होऊ दे चर्चा...

होऊ दे चर्चा...

व्हॉट इज युवर
मोबाईल नंबर ?

(स्थळ : पॉलिटिकल मोबाईल शॉपी. ‘येथे सर्व नेत्यांचे मोबाईल दुरुस्त करून मिळतील,’ असा बोर्ड लावलेला. ऐन निवडणुकीत नेत्यांचीही वर्दळ वाढलेली.)
पाचपुते : (जुना मोबाईल काऊंटरवर ठेवत) या हॅन्डसेटला काय झालंय बघा. पूर्वीच्या मोबाईलवर ‘घड्याळाचा डिस्प्ले’ नीट दिसत नव्हता म्हणून बदलला, तर आता याच्या रिंंगटोनमधून बघावं तेव्हा ‘बबन... कमळ बघ!’ अस्साच आवाज येतोय.
दुकानदार : (हात जोडत) ‘बदलाबदली’ची एक्स्चेंज स्कीम गेल्या महिन्यातच संपली राव. जिथंपर्यंत चालतोय तिथंपर्यंत चालवा, नाहीतर पुन्हा बदलायला तुम्ही एका पायावर तयार आहातच की.
(एवढ्यात ‘डीएनए’ कंपनीचा ‘ओरिजनल’ मोबाईल घेऊन ‘राज’ शोरूममध्ये दाखल.)
राज : हे पहा मिस्टरऽऽ. आठ-दहा वर्षांपूर्वी माझ्या मोबाईलमधून ‘मातोश्री’वरचा एक नंबर गायब झालाय. तो पुन्हा डाऊनलोड करून द्या.
दुकानदार : (आठवून करून देत) पण, साहेऽऽब. तो नंबर तर तुम्हीच ‘ब्लॉक’ करून टाकला होता. एकवेळ ‘हातात घड्याळ’ बांधेन; पण तोे नंबर ओपन नाही करणार... असं तुम्हीच म्हणाला होता नां तेव्हा!
राज : (गडबडून जात) माझं कालचं बोलणं आज नसतं. आजचा शब्द कदाचित उद्याही नसतो. तेव्हा ताबडतोब तो नंबर भरून द्या.
(‘तो’ नंबर टाकून ‘कॉल’ लावलेला.)
राज : (गहिवरून) मी राज. तुमचं नाव काय ?
उद्धो : (तिकडून) माझं नाव शिवसेनाऽऽ
(कट करत ‘राज’नं पुुन्हा कॉल लावलेला. पण यावेळी ऐकू येतं, ‘आपने जिसे कॉल किया है; वो अभी ‘आनंदीबाई’ के साथ व्यस्तऽऽ है!)
राज : (चरफडून ) प्रत्येकवेळी रक्ताच्या नात्यात ही ‘पार्टी’ अन् ‘फॅमिली’ का मध्ये येते, कुणास ठावूक़ ‘आनंदीबाई’ अन् ‘आनंदीबेन’नं डोकं उठवलंय माझं. चलाऽऽ येतो मी. बिल चुकतं करायला माझा ‘बाळा’ येईल नंतर.
(सुटकेसमधल्या कपड्यात गुंडाळलेला इम्पोर्टेड मोबाईल घेऊन अजितदादांचं आगमन.)
दादा : कऱ्हाडातल्या आमच्या उमेदवाराला कालपासून कॉल करतोय; पण ‘आपका कॉल फॉरवर्डऽऽ हो रहा है,’ एवढंच ऐकू येतंय. नंतर कुणीतरी ‘बाबा’ तिकडून ‘माझ्या राज्यात गुंडागिरी नाही!’ असंही काहीतरी जोरजोरात सांगतोय. जरा बघाऽऽ काय झालंय या मोबाईलला?
दुकानदार : (शांतपणे) मोबाईलला काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त तुमचा उमेदवारच डायरेक्ट ‘बाबां’ना ‘फॉरवर्ड’ झालाय. पण काहीही म्हणा, तुमचा नवा मोबाईल एकदम भारी. चार लाखांना घेतलाय वाटतं?
(‘दादांचा पक्षनिधी सापडला’ या बातमीचा अंक घाईघाईनं गुंडाळत दादा गायब. जुना-तुटका-मुटका मोबाईल घेऊन सदाभाऊंचं आगमन.)
सदाभाऊ : डायरीऽऽक्ट ‘सुरत’ बरूबर कॉनटॅऽऽक्ट करूनशान देणारा मोबाईल द्या बगू बिगीबिगी. ‘हातकणंगले’च्या लोकल कॉलचा लई कंटाळा आलाय बगा आता.
दुकानदार : (नव्या मोबाईलवरून ‘अमितभार्इं’ना कॉल लावून देत) ‘तिकीट-वाटपाची लॉटरी’ चांगलीच फुटली वाटतं. हंऽऽ बोला.
सदाभाऊ : अमितभाई छे के ऽऽ.. तमे तमारा भाषण मा उंदर किदुतु ऐटले, मारा खेडुत भाई रोज मने दस-बार उंदरा लयावी दिये छे ! हवे हूँँ शु करू ?
(आदरणीय सदाभाऊ नेमकं काय म्हणाले, याचा आम्ही पामरांनी शोध घेतला असता धन्यधन्य जाहलो. ‘गुजराती टू मराठी’ भाषांतर पुस्तक चाळल्यानंतर कळालेला हा अर्थ : ‘कोण अमितभाई काऽऽ.. तुम्ही तुमच्या भाषणात उंदीर म्हणालात, तेव्हापासून आमचे शेतकरी रोज दहा-बारा उंदरं मारून मला देताहेत. आता मी त्याचं काय करू?’) - सचिन जवळकोटे

Web Title: Let's talk ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.