होऊ दे चर्चा...

By Admin | Updated: October 10, 2014 05:22 IST2014-10-10T05:21:56+5:302014-10-10T05:22:13+5:30

नरेंद्रभार्इंनी स्टेजवरच कौतुक केल्यानंतर त्यांचे गाल कसे लाजून अजून टम्म झाले होते ना... अगदी तस्सं !

Let's talk ... | होऊ दे चर्चा...

होऊ दे चर्चा...

सचिन जावळकोटे - 
कभी-कभी मेरे दिल में खयाऽऽल आता है!
(‘शमिताभ नामक नव्या पिक्चरमध्ये अमिताभ अन् रेखा पुन्हा एकत्र’ ही बातमी वाचताच बंडूनाना हरखले. त्यांना त्यांच्या तारुण्यातली कॉलेजची पिंकी आठवली. तोंडावर पेपर ठेवून, रेखासारखा दिसणारा तिचा चेहरा डोळ्यांसमोर आणण्याच्या प्रयत्नात बंडूनाना. एवढ्यात त्यांना एक नाजूक हाक ऐकू आलेली.)
पिंकी : बंड्याऽऽ बंडू ऽऽ .. ओळखलंस का मला ?
बंडूनाना : (दचकून) काऽऽय पिंकी तू... अन् इथं ? मी स्वप्नात तर नाही ना ? एकवेळ ‘सीएम खुर्चीवर उध्दो’ बसलेलंही खरं वाटेल; पण तू साक्षात माझ्यासमोर? थांब चिमटा काढून बघतो.
पिंकी : (दंड चोळत) ऊई ऽऽमां... पण मला का चिमटा काढतोयंस? कॉलेजातला वेंधळेपणा गेला नाही वाटतं तुझा अजून. रामदासांसारखं अजूनही या वयात काय भलत्याच गमती-जमती करतोस ?
बंडूनाना : (कसंनुसं हसत) हेऽहेऽहेऽ ह्याऽऽ...ह्याऽऽ. तेहतीस वर्षांनंतर तू समोर आलीस; त्यामुळे मीपण देवेंद्रपंतांसारखं हरखून गेलोय. नरेंद्रभार्इंनी स्टेजवरच कौतुक केल्यानंतर त्यांचे गाल कसे लाजून अजून टम्म झाले होते ना... अगदी तस्सं !
पिंकी : (वेणीशी चाळा करत लाडिकपणे) आम्हीऽऽ नाही जाऽऽ आता किन्हऽऽई बोलणारच नाही.
बंडूनाना : (छाती चोळत) त्या ‘शेट्टीं’नी पण तेव्हा असंच म्हटलं अन् ‘मातोश्री’वर जोरदार कळ आली होती बघ. पण काहीही म्हण, तू अजूनही तश्शीऽऽच दिसतेस सुंदर. काहीच फरक पडला नाही तुझ्यात. आईऽऽगं.
पिंकी : (उजव्या पायाच्या अंगठ्यानं जमीन उकरत) तू पण काही कमी नाहीस म्हटलं. फक्त टक्कल अन् पांढऱ्या मिशा एवढाच काय तो फरक. नाहीतरी अमिताभ अजूनही तरणाबांडच वाटतो की या वयात. पुरुषाचं वय नव्हे तर कर्तृत्व बघायचं. ‘थोरल्या काकां’च्या कामाचा झपाटाही तस्साऽऽच बघ.
बंडूनाना : (नसलेली छाती फुगून आल्यानं नीट श्वास घेण्याची कसरत करत) मी पण तेच म्हणतोय. जर तेहतीस वर्षानंतर अमिताभ अन् रेखा पुन्हा एकत्र येणार असतील तर आपण काय घोडं मारलंय? (हळूच थोडसं पुढं सरकत) चलऽऽ आपणही युती करू या.
पिंकी : (लाजून मागं सरकत) इश्श्ऽऽ. कुणी बघेल नां. उगाच ‘राज-उध्दव’च्या न जुळलेल्या प्रेमासारखा विनाकारण गाजावाजा व्हायला नको.
बंडूनाना : (पिंकीची एकेक अदा पाहून अस्वस्थ होत) मग आपण ‘नरेंद्रभाई-थोरले काका’ यांच्यासारखा गुपचूप-गुपचूप संवाद साधू. जानकरांनी नाही का सांगितलं होतं.
पिंकी : पण आता नको ना. नंतर कधीतरी भेटू आपण.‘राज’ म्हणाले तसं एकोणीस तारखेनंतरच ‘एकत्र यायचं’ बघू.
बंडूनाना : (आवंढा गिळत) अमिताभसोबत काम करायला जर रेखा तयार झाली असेल तर तुझा का मला नकार ? उगाच त्या ‘उध्दों’सारखं नसते आढेवेढे घेऊन हातचं गमावून बसशील.
पिंकी : (अजून फुरगंटून) अस्संऽऽ का ? मग निवडणुकीतल्या उमेदवारांसारखं माझ्यासमोर विनवण्या कर बघू.
बंडूनाना : (रोमॅँटीक मूडमध्ये गुडघ्यावर बसून तिचा हात हातात घेत ) ठीकाय. मग ऐक... कभी कभी मेरे दिल में खयाल आता है कि, जिंदगी तेरी जुल्फों की नर्म छांव में गुजरनें पाती तो शादाब हो भी सकती थी...
(एवढ्यात बंडूनानांना बायकोचा नेहमीचा दमदार, कणखर अन् मजबूत आवाज ऐकू येतो.)
पिंकी : (खेकसत) अहोऽऽ. उठा. दिवाळीच्या तोंडावर गॅस संपलाय. झोपेत काय बडबडताय कभी-कभी... ताबडतोब जाऊन सिलिंडर आणा अभी-अभी !
 

Web Title: Let's talk ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.