होऊ दे चर्चा...

By Admin | Updated: October 9, 2014 04:35 IST2014-10-09T04:35:29+5:302014-10-09T04:35:29+5:30

कॅमेरा आॅन करत) नमस्कार विनोदभाऊ ऽऽ तुमचा एक नंबरचा शत्रू कोण ? विनोद : (कॅमेरा पाहताच ‘मोदी जाकीट’च्या गुंड्या नीट करत) पक्षातला की पक्षाबाहेरचा ? कारण नागपुरात नरेंद्रभार्इंनी

Let's talk ... | होऊ दे चर्चा...

होऊ दे चर्चा...

शत्रूच्या मित्राचा शत्रू म्हणे तोच खरा मित्र !


(‘यंदाच्या निवडणुकीत नेमका कोणता पक्ष कुणाच्या विरोधात?’ या किचकट पॉइंटवर सर्व्हे करायला एका टीव्ही चॅनलची टीम मोहिमेवर निघालेली.)
टीम : (कॅमेरा आॅन करत) नमस्कार विनोदभाऊ ऽऽ तुमचा एक नंबरचा शत्रू कोण ?
विनोद : (कॅमेरा पाहताच ‘मोदी जाकीट’च्या गुंड्या नीट करत) पक्षातला की पक्षाबाहेरचा ? कारण नागपुरात नरेंद्रभार्इंनी कौतुक केल्यामुळं काहीजण शेफारलेत.
टीम : (गोंधळून) ‘तुमचा एक नंबरचा शत्रू-पक्ष कोणता?’ असं आम्ही विचारतोय. ‘पक्षातला शत्रू कोण?’ नव्हे!
विनोद : आमचा शत्रू एकच. ‘मातोश्री’वरचे पिता-पुत्र. ‘महाराष्ट्राचं सिंहासन’ म्हणजे त्यांची जहागिरी नव्हे!
(मग टीम ‘मातोश्री’वर जाते.)
टीम : उद्धोजी... तुमचा शत्रू कोण ?
उद्धो : दहा वर्षांपूर्वी राणे-भुजबळ. पाच वर्षांपूर्वी राज...अन् आता देवेंद्र-रामदास.
आदित्य : माझा तर शत्रू एकच. एकनाथभाऊ . म्हणजे ‘मम्मा’ तसं काल सांगत होती; कारण मला कुणी ‘छोटू’ म्हटलेलं तिला बिलकूल आवडत नाही.
टीम : (पुन्हा गोंधळून) पण, शत्रूपक्ष कोणता ?
उद्धो : (आशिषच्या फोटोकडं रागानं बघत) आमचा शत्रू ज्या पक्षात, तोच आमचा शत्रूपक्ष. युती तुटल्याचं दु:ख नाही, दोस्ती तोडणाऱ्याचा राग जास्त.
(‘परफेक्ट टाईम’ पाळत टीम ‘राज’कडं निघाली. दुपारी साडेबारानंतरच त्यांनी ‘कृष्णकुंज’ गाठलं.)
टीम : (‘बूम’ समोर धरत; कारण ते समोर असल्याशिवाय ‘राज’ लवकर बोलत नाहीत, हे माहीत झाल्यानं) तुमचा शत्रू कोण ?
राज : (मागचं बॅकग्राऊंड व्यवस्थित आहे की नाही, हे नीट निरखत ) धनुष्यबाण. धनुष्यबाण. धनुष्यबाण !
टीम : (आपापसात कुजबुजत) प्रचाराच्या भाषणात पण म्हणे यांच्या तोंडी ‘धनुष्यबाण’च. लोकांनाच कळेना की, बटण ‘धनुष्यबाण’वर दाबावं की ‘रेल्वेइंजिन’ वर ?
(टीम डोकं खाजवत ‘पृथ्वीराज’ बाबांच्या कऱ्हाडात.)
टीम : (पेन सरकावत) बाबाऽऽ तुमचा शत्रू कोण ?
बाबा : (कागदावर नाव लिहून खाली झोकदार सही ठोकत) दादा. दादा...अन् दादाच !
(प्रत्येकानं पक्षापेक्षा व्यक्तीलाच ‘दुश्मन’ ठरवल्यानं कंटाळलेली टीम ‘औंध-जरंडेश्वर’मार्गे बारामतीत दाखल.)
टीम : दादा ऽऽ तुमचा नंबर वन शत्रू कोण ?
अजितदादा : (भरपूर नावं आठवत) सांगता येत नाही. कारण ‘सांगतो, बघतो, करतो!’ असली भाषा माझ्या तोंडी नाही. ‘खोटं बोल पण रेटून बोल,’ हेही मला जमत नाही.
(डोळे विस्फारत टीम ‘थोरल्या काकां’च्या बंगल्यात.)
टीम : काका ऽऽ काका ऽऽ तुमचा शत्रू कोण ?
थोरले काका : (मिस्किलपणे) शत्रू ? कसला शत्रू ? माझे तर सारेच मित्र. ‘मोदी’ माझे मित्र. ‘सुशीलकुमार’ही माझे दोस्त. ‘राज’ माझा आवडता. ‘उद्धो’तर जीवलग मित्राचा मुलगा. सारेच माझे मित्र... कारण ‘खुर्ची’ हीच खरी मैत्री. ‘पिक्चर’मध्ये ‘साईड हिरों’ची कितीही मारामारी होऊ दे; पण शेवटी ‘क्लायमेक्स’ माझ्याच हातात. म्हणूनच ये दोस्ती ऽऽ हम नही तोडेंगे ऽऽ
- सचिन जवळकोटे

Web Title: Let's talk ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.