पानसरेंच्या विचारांचा लढा सुरु ठेवू

By Admin | Updated: February 23, 2015 00:46 IST2015-02-23T00:45:13+5:302015-02-23T00:46:29+5:30

शमिम फैजी : भाकपच्या २२ व्या राज्यस्तरीय अधिवेशनात निर्धार

Let's continue the fight for PanSray | पानसरेंच्या विचारांचा लढा सुरु ठेवू

पानसरेंच्या विचारांचा लढा सुरु ठेवू

कोल्हापूर : गोविंद पानसरे यांची हत्या हा भाकपच्या विचारधारेवरील हल्ला आहे. पानसरेंची लढाई कधीच व्यक्तिगत नव्हती. अंधश्रद्धा, धर्मनिरपेक्षता, जातिभेद निमुर्लनासाठी त्यांनी आयुष्य वेचले. पानसरेंच्या निधनामुळे आम्ही दु:खी जरूर झालो आहोत, पण खचणार नाही. विचारांची ही लढाई नव्या प्रेरणेने आणि नव्या जोमाने सुरू करण्याचा निर्धार आम्ही या अधिवेशनात करत आहोत, असे भाकपचे राष्ट्रीय सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड शमिम फैजी यांनी सांगितले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या येथील २२ व्या त्रैवार्षिक राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन रविवारी शाहू स्मारक भवनात फैजी यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या अधिवेशनास प्रारंभ झाला.
फैजी म्हणाले, पानसरे जी लढाई लढली, ती कधीच संपणार नाही. त्यांनी धर्मनिरपेक्षता, समता या तत्त्वांसाठी सातत्याने लढा दिला. पानसरेंच्या या लढ्याला विरोध करणाऱ्या धर्मांध वृत्तीची केंद्रात आणि राज्यात सत्ता आहे. याच प्रवृत्तींनी पानसरे यांची हत्या केली आहे, असे आमचे ठाम मत आहे.
ते म्हणाले, पानसरे यांची हत्या निषेधार्ह आहे. या हत्येच्या निषेधार्थ ११ मार्चला पुरोगामी आणि डाव्या पक्षातील कार्यकर्ते मुंबई येथे महामोर्चा काढणार आहेत. या मोर्चात सुमारे एक लाख लोक सहभागी होतील.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य उदयन शर्मा म्हणाले, प्रतिगामी शक्ती सांस्कृतिक राष्ट्रवादाचा बनाव रचत आहेत. हा बनाव रोखण्यासाठी आपल्याला केवळ राजकीय आघाडीवर काम करून चालणार नाही, तर सांस्कृतिक लढाईही लढावी लागणार आहे. यावेळी लाल निशाण पक्षाचे सुभाष गुरव, जनता दल (सेक्युलर)चे शिवाजी परुळेकर आदींची भाषणे झाली.
यावेळी भाकपचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. भालचंद्र कांगो, राष्ट्रीय कौन्सिलचे सदस्य मनोहर देशकर, राज्य सहसचिव तुकाराम भस्मे, राष्ट्रीय कौन्सिल सदस्य सुभाष लांडे, राज्य सचिव मंडळ सदस्य सुकुमार दामले, नामदेव गावडे, नामदेव चव्हाण, शिवकुमार गणवीर, मनोहर टाकसाळ, तानाजी ठोंबरे, माधुरी क्षीरसागर, प्रतिभा बोबडे आदी उपस्थित होते. ध्वजारोहण ज्येष्ठ नेते दत्ता मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी गेल्या तीन वर्षांत पुरोगामी चळवळीशी संबंधित असलेल्या देश-विदेशांतील ज्या व्यक्ती दिवंगत झाल्या आहेत, त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दुपारच्या सत्रात गेल्या तीन वर्षांत पक्षाच्या संघटनात्मक आणि राजकीय कामगिरीच्या अहवालावर चर्चा करण्यात आली. (प्रतिनिधी)


पानसरेंच्या अनुपस्थितीतील पहिले अधिवेशन
गोविंद पानसरे नामक पक्षाच्या एका लढाऊ योध्याच्या अनुपस्थितीमध्ये पक्षाचे राज्यस्तरीय अविधेवशन कोल्हापुरात सुरू झाले. राज्यस्तरीय अधिवेशनात पानसरेंची उपस्थिती नेहमीच असायची. पक्षाचे एकविसावे अधिवेशन अण्णांच्या मूळ जिल्ह्णात अर्थात अहमदनगरला झाले होते. यावर्षीचे अधिवेशन त्यांच्या कर्मभूमीत-कोल्हापुरात होते. पण काळाने डाव साधल्यामुळे पानसरें या अधिवेशनाच्या विचारमंचावर रविवारी दिसले नाही. जणू एक योद्धा गमावल्याची भावनाच सभागृहातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती.

Web Title: Let's continue the fight for PanSray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.