राष्ट्रवादीशी आघाडीचा विचार व्हावा
By Admin | Updated: September 20, 2016 02:13 IST2016-09-20T02:13:25+5:302016-09-20T02:13:25+5:30
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पक्षाचे १०० नगरसेवक निवडून येतील, असे सांगून काँग्रेसला गाफील ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

राष्ट्रवादीशी आघाडीचा विचार व्हावा
पिंपरी : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पक्षाचे १०० नगरसेवक निवडून येतील, असे सांगून काँग्रेसला गाफील ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. काँग्रेसमध्ये येणाऱ्यांना खीळ बसावी, असे राष्ट्रवादीचे धोरण दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याचा गंभीरपणे विचार व्हावा, अशी मागणी एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.
गेल्या पंधरा वर्षांत काँग्रेसचे पदाधिकारी, नगरसेवक यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देऊन काँग्रेस पक्ष कमकुवत केला असल्याचेही म्हटले आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या चर्चांना ऊत आला. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षाच्या मेळाव्यात राष्ट्रवादीचे १०० नगरसेवक निवडून येणार असल्याचा दावा केला. महापालिकेत नगरसेवकांच्या जागा १२८ आहेत.
राष्ट्रवादीचे १०० नगरसेवक निवडून आल्यास आघाडीत काँग्रेसला किती जागा देणार, असा प्रश्न उपस्थित होतो. पिंपरी-चिंचवडमध्ये काँग्रेसच्या आजच्या अवस्थेला राष्ट्रवादीच जबाबदार असल्याची आठवणही त्यांनी पत्रात करून दिली आहे.
गेल्या एक-दोन वर्षांपासून राष्ट्रवादीचे नेते काँग्रेसला संपविण्याची विधाने करत होते. स्थानिक पातळीवर पक्षाचे नेते व पदाधिकाऱ्यांना गाफील ठेवण्याचा राष्ट्रवादीकडून प्रयत्न होत आहे. काँगे्रसमधील कार्यकर्ते राष्ट्रवादीबरोबर आघाडी करण्याबाबत सकारात्मक नसून, त्यांच्या मनात संभ्रम आहे. पक्षातील सर्वांची मते आजमावून मगच आघाडीचा निर्णय घेण्यात यावा, अशीही मागणी कांबळे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)