जनतेलाही आनंद होऊ द्या - उद्धव ठाकरेंचा नव्या मंत्र्यांना सल्ला
By Admin | Updated: July 7, 2016 07:57 IST2016-07-07T07:54:22+5:302016-07-07T07:57:34+5:30
लाल दिव्याची गाडी मिळाल्याने आनंदी झालेल्या मंत्र्यांनी वेळ न घालवता कामाला लागावे, जनतेच्या समस्या दूर करून त्यांनाही आनंदी होऊ द्या असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

जनतेलाही आनंद होऊ द्या - उद्धव ठाकरेंचा नव्या मंत्र्यांना सल्ला
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळातील फेरबदल व विस्तारात शिवसेनेला जागा न मिळाल्याने दु:खी झालेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नव्या मंत्र्यांना कामाला लागण्याचा सल्ला देत जनतेलाही आनंद साजरा करू द्या असा टोला हाणला आहे. ' लाल दिव्याची गाडी मिळाल्याने आनंदी झालेल्या मंत्र्यांना पंतप्रधान मोदींनी वेळ न घालवता कामाला लागण्यास सांगितले आहे, हे बरोबरच आहे. कारण महागाई, काळा पैसा, दहशतवाद या सर्व प्रश्नांचे भस्मासुर तांडव करत असून ते भस्मासुर नष्ट होतील तेव्हा जनताही आनंद साजरा करील. आम्ही त्याच दिवसाच्या प्रतीक्षेत आहोत' असे उद्धव यांनी म्हटले 'सामना'तील अग्रलेखात म्हटले आहे.
तसेच स्मृती इराणी यांच्याकडून मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून घेण्याच्या निर्णयावरही उद्धव यांनी टिप्पणी केली असून इराणी यांच्या कार्यकाळात जे वाद निर्माण झाले त्यामुळे डॉ. अनिल काकोडकरांपासून इतर बरेचजण अपमानित झाले, असे म्हटले आहे. देशाचे शैक्षणिक धोरण एकाच व्यक्तीच्या मर्जीवर चालत नाही, ती सामुदायिक जबाबदारी असते, असेही त्यांनी अग्रलेखात नमूद केले आहे. तसेच या खातेबदलामुळे इराणी यांना उत्तर प्रदेश निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा ‘चेहरा’ म्हणूनदेखील फिरवले जाऊ शकते, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
आणखी वाचा :
काय म्हटले आहे अग्रलेखात :
- जनतेलाही आनंद होऊ द्या!
मंत्रीपदाची लॉटरी लागल्यावर कुणाला आनंद होणार नाही! राजकारणात सगळा खटाटोप हा त्या लाल दिव्यासाठी तर असतो; पण १९ नव्या मंत्र्यांना पंतप्रधान मोदी यांनी असे मार्गदर्शन केले आहे की, ‘‘तुम्हाला आनंद साजरा करायला कमी वेळ आहे. फारच कमी वेळ आहे. लगेच कामाला लागा.’’ पंतप्रधानांचे हे मार्गदर्शन लाखमोलाचे आहे. पंतप्रधानांनी आपल्या मंत्रिमंडळाचा फक्त विस्तारच केला नाही, तर महत्त्वाचे खांदेपालटही केले आहेत. पाच राज्यमंत्र्यांना ‘नापास’ करून घरी पाठवले व अनेक मंत्र्यांच्या खात्यात मोठे फेरबदल केले. संपूर्ण देशाचा कारभार पंतप्रधान मोदी एकहाती चालवतात ही दंतकथा पसरली असली तरी मोदी यांनी त्यांचे मंत्रिमंडळ काँग्रेजी पद्धतीचे ‘जम्बो’ बनवले आहे. अर्थात मंत्रिमंडळाचा आकार लहान ठेवून ते कार्यक्षम व गतिमान ठेवावे अशी स्वत: पंतप्रधानांची कितीही इच्छा असली तरी राजकारणात असे करणे भल्याभल्यांना जमलेले नाही. पक्ष व सरकार चालविण्यासाठी इच्छा नसतानाही खोगीरभरती करावी लागते.
- मोदी यांनी खांदेपालटात सगळ्यात मोठा धक्का दिला आहे तो स्मृती इराणी यांना. त्यांच्याकडील मनुष्यबळ विकास मंत्रालय काढून त्यांच्याकडे वस्त्रोद्योग मंत्रालयाचा भार सोपवला. मनुष्यबळ विकास मंत्रालय देशाचे सर्वच बाबतीतले शैक्षणिक धोरण ठरविणारे असते. मौलाना अबुल कलाम आझाद यांच्यापासून पी. व्ही. नरसिंह रावांपर्यंत, अनेक दिग्गजांनी हे मंत्रालय मोठ्या सन्मानाने व अक्कलहुशारीने सांभाळले. स्मृती इराणी यांना हे खाते देऊन भाजपने स्मृती इराणींचे राजकीय वजन वाढवले. त्या बोलण्यात तेजतर्रार वगैरे होत्या हे सर्व ठीक आहे, पण त्यांच्या कार्यकाळात अनेक वाद उद्भवले, त्या वादग्रस्त ठरल्या आणि त्याचा ठपका मोदींवर बसला. त्यांच्या ‘डिग्री’ प्रकरणात आम्हास पडायचे नाही. ‘डिग्री’ असल्यामुळेच माणूस हुशार व कर्तबगार होतो असे मानायला आम्ही तयार नाही, पण श्रीमती इराणी यांच्या काळात जे वाद निर्माण झाले त्यामुळे डॉ. अनिल काकोडकरांपासून इतर बरेचजण अपमानित झाले. देशाचे शैक्षणिक धोरण एकाच व्यक्तीच्या मर्जीवर चालत नाही, ती सामुदायिक जबाबदारी असते.
- अर्थात इराणी या वस्त्रोद्योग खात्यातही उत्तम काम करतील व मुंबईसारख्या शहरातील गिरणी कामगारांच्या प्रश्नांवरील जळमटे दूर होतील अशी आम्हाला आशा आहे. पुन्हा या खातेबदलामुळे इराणी यांना उत्तर प्रदेश निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा ‘चेहरा’ म्हणूनदेखील फिरवले जाऊ शकते. अर्थात इराणी यांच्याकडील मनुष्यबळ विकास मंत्रालय महाराष्ट्राच्या प्रकाश जावडेकरांना मिळाले ही जमेचीच बाजू झाली. जावडेकर यांना बढती मिळून ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री झाले. बाकी काही खाती यांच्याकडून त्यांच्याकडे तर त्यांच्याकडून यांच्याकडे आली. राज्यमंत्री पदांच्या खांदेपालटाने धोरणांवर व गतिमानतेवर प्रभाव पडत नाही. बाकी राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू यांच्याकडील खात्यांना व पदांना धक्का लागलेला नाही. रामदास आठवले यांना सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री पद मिळाल्याने ते आनंदात आहेत. त्यांना आता बंगला मिळेल. लाल दिव्याची गाडी मिळेल. हे स्वप्न अनेकांचे असते व त्यासाठीच अट्टहास करावा लागतो; पण शेवटी पंतप्रधानांनी नव्या मंत्र्यांना सांगितले तेच महत्त्वाचे. ‘‘कामाला लागा. आनंद साजरा करायला वेळ नाही.’’ हे बरोबरच आहे. कारण महागाई, काळा पैसा, दहशतवाद या सर्व प्रश्नांचे भस्मासुर तांडव करीत आहेत. हे भस्मासुर नष्ट होतील तेव्हा जनताही आनंद साजरा करील.