स्वातंत्र्याच्या नव्या स्वप्नांची पहाट उजळू दे!

By Admin | Updated: August 14, 2016 01:34 IST2016-08-14T01:33:54+5:302016-08-14T01:34:13+5:30

--रविवार विशेष

Let the dawn of new dreams of independence! | स्वातंत्र्याच्या नव्या स्वप्नांची पहाट उजळू दे!

स्वातंत्र्याच्या नव्या स्वप्नांची पहाट उजळू दे!

प्रदीर्घ स्वातंत्र्य संग्रामातून देशाला स्वातंत्र्य मिळून आज सात दशके पूर्ण होत आहेत. पंडित नेहरू यांनी दिलेले आश्वासक भाषणही आता विस्मृतीत जाते आहे का? असे वाटू लागले आहे. १८१८ पूर्वीची परिस्थिती पुन्हा एकदा वेगवेगळ््या स्वरुपात पुढे येते आहे का ?
‘‘संपूर्ण जग गाढ झोपेत असताना भारताच्या स्वातंत्र्याची पहाट होत आहे. जी स्वप्ने आपण पाहिली, ती सत्यात उतरविण्यासाठी कटिबद्ध होऊ या’’ असे आश्वासक उद्गार भारताचे पहिले पंतप्रधान आणि स्वातंत्र्ययोद्धा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संसदेच्या सभागृह १५ आॅगस्ट १९४७ या दिवसाची सुरुवात होता काढले होते. मध्यरात्र झाली होती. १५ आॅगस्टची सुरुवात रात्री बारा वाजता झाली होती. पंडित नेहरू यांचे ओतप्रोत आश्वासक भाषण संपूर्ण देशालाच नव्हे, तर जगाला उद्देशून होते. ही स्वातंत्र्याची तारीख २६ जानेवारी असायला हवी असे अनेकांना वाटत होते. कारण काँग्रेसच्या १९२९ मध्ये लाहोर येथे झालेल्या अधिवेशनातील ठरावानुसार २६ जानेवारी १९३० रोजी देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला होता. त्यात हजारो नव्हे, तर कोट्यवधी जनतेने सहभाग घेतला होता. गावापासून महानगरापर्यंत सर्वत्र झेंडा वंदन करून आपण स्वतंत्र झालो आहोत, असे जाहीर करण्यात आले होते. याच अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली होती आणि महात्मा गांधी यांचे नेतृत्व देशव्यापी झाले होते. त्यांचे अनुयायित्व नेहरू यांच्याकडे होते. त्यामुळे या देशव्यापी आंदोलनात्मक स्वातंत्र्यदिन साजरा करण्याच्या मोहिमेला विशेष महत्त्व होते.
देशभरातील असंख्य सत्याग्रहींच्या मनात २६ जानेवारी ही तारीख पक्की झाली होती. मात्र, ब्रिटिश राजवटीचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांनी ही तारीख चुकविली. अन्यथा, २६ जानेवारी १९४७ रोजी भारतीय स्वातंत्र्याचा दिन साजरा करण्यात आला असता. त्याऐवजी १५ आॅगस्ट १९४७ रोजी भारताने स्वातंत्र्य घ्यावे, असे त्यांनी ठरविले. त्यालाही एक ऐतिहासिक बाजू होती; पण ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणाचा आविष्कारही त्यात लपला होता. दोनच वर्षांपूर्वी म्हणजे १९४५ मध्ये १५ आॅगस्ट रोजी जपानने दुसऱ्या महायुद्धात आपला पराभव झाल्याचे मान्य केले होते आणि दुसऱ्या महायुद्धाची समाप्ती झाली होती. ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी विचारधारेतून लादलेल्या युद्धात विजय झाला होता. त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ १५ आॅगस्ट ही तारीख निश्चित करावी, त्या दिवशी भारत स्वातंत्र्य घेईल, असे लॉर्ड माऊंटबॅटन यांनीच ठरविले होते. स्वातंत्र्याचा एकोणसत्तरावा दिन उद्या, सोमवारी आपण साजरा करणार आहोत. १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन्ही राष्ट्रीय सण भारतीय लोकशाहीच्या इतिहासात सुवर्ण दिन ठरले आहेत. त्याच्या मागे एक उदात्त हेतू, धोरण, प्रेरणा आणि स्वप्नांचा आविष्कारही होता. त्यामुळेच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्य भारताचे नेतृत्व करताना खूप आश्वासक आवाहन केले होते. नव्या स्वप्नांचा भारत आज स्वतंत्र होतो आहे, असे ते म्हणाले होते. त्याला आज एकोणसत्तर वर्षे पूर्ण होत आहेत. आणखीन सहा वर्षांनी देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करेल. हा एक मोठा टप्पा असेल कारण भारताची वाटचाल एका खडतर प्रसंगातून आणि दिव्यातून झाली आहे. एक महान देश तयार होत असताना, लोकशाही मार्गाने विश्वशांतीचा संदेश घेऊन जात असताना फाळणीचे दु:ख उरावर होते. ती प्रचंड जखम आजही वेदनादायी वाटते आहे. त्यातून देश सावरला असला तरी जखम भरून आलेली नाही. त्याचे पडसाद वारंवार उमटताहेत. काश्मीर आज पेटला आहे. संपूर्ण लष्कराच्या नियंत्रणाखाली काश्मिरी जनता आहे. लोकशाही राष्ट्र उभारणीत लष्कराचे महत्त्व अनन्यसाधारण असले तरी तिचा अंमल राहणार नाही, असे मानले जात होते. याच प्रेरणेतून देशाच्या दुर्दैवाने १९७५ मध्ये संपूर्ण देशभर आलेल्या आणीबाणीला प्रखर विरोध करण्यात आला होता.
एका लेखकाने देशाच्या स्वातंत्र्य लढ्यावर भाष्य करताना ब्रिटिशांचे साम्राज्याचा संपूर्ण विस्तार होतानाच्या परिस्थितीचे खूप मार्मिक वर्णन केले होते. ते म्हणतात, ब्रिटिशांचे राज्य १८१८ साली सुरू झाले. कायदा, सुव्यवस्था, प्रशासन आणि शिक्षण यांच्याबाबत त्यांनी केलेल्या सुधारणा लोकांना आवडल्या होत्या. ब्रिटिश येण्यापूर्वी ठग, पेंढारी यांची प्रचंड दहशत होती. यात्रेकरूंना लुटून त्यांना मारून टाकणारे ठग स्वत:ला कालिमातेचे भक्त म्हणवीत होते. मारलेल्या निरपराध्यांची मुंडकी ते कापून घेत. उरलेलं धड, पोट फाडून पुरून टाकीत. त्यामुळे प्रवास अतिशय धोक्याचा होता. बैलगाडीशिवाय वाहन नव्हतं, न्याय जातीच्या आधारे दिला जात असे, सर्वांना समान कायदा ही कल्पनाही नव्हती. शिक्षण उच्च समजल्या जाणाऱ्या जातींची मक्तेदारी होती. इतरांना तसेच स्त्रियांना शिकण्याची मनाईच होती. ब्रिटिशांनी ठग, पेंढारी यांचा बंदोबस्त केला. रेल्वेचं जाळं तयार केलं. न्यायदानात जातीचा विचार बाजूला सारला. संपूर्ण देशासाठी एक प्रशासन व्यवस्था लावली, एक चलन रूढ केलं, शिक्षणाचे दरवाजे सर्वांसाठी उघडले. त्यामुळे ब्रिटिश इथे भल्यासाठी आले आहेत, असंही काहींना वाटू लागलं होते. त्यांनी एक वचन दिले होते की, येथील धार्मिक जीवनात ढवळाढवळ करणार नाही. ते काही ते पाळले नाही. व्हिक्टोरिया राणीच्या राज्यात काशी यात्रा सुखानं करता येते, असे वाटण्याचा तो काळ होता.
ब्रिटिशांच्या राजवटीपूर्वीची ही परिस्थितीच आपणास पारतंत्र्यात घेऊन जायला कारणीभूत होती की काय? असे वर्णनावरून वाटते. मात्र, त्यांची (ब्रिटिशांची) पद्धतशीर शोषणाचे रूप पुढे लक्षात येऊ लागले तशा स्वातंत्र्य युद्धाची बीजे रोवली जाऊ लागली. प्रदीर्घ स्वातंत्र्य संग्रामातून देशाला स्वातंत्र्य मिळून आज सात दशके पूर्ण होत आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दिलेले आश्वासक भाषणही आता विस्मृतीत जाते आहे का? असे वाटू लागले आहे. १८१८ च्या पूर्वीची परिस्थिती पुन्हा एकदा वेगवेगळ््या स्वरुपात पुढे येते आहे का? असे वाटू लागले आहे. कोपर्डीच्या घटनेचा अन्वयार्थ आणि त्यांच्या प्रतिक्रियेचे विश्लेषण कोणत्या बाजूने करणार आहोत? शिक्षण गरिबांचे राहिले नाही. आता त्याला जातिभेदाचा किंवा लिंगभेदाचा आधार नाही; पण हेच स्वरूप त्याचे आहे का? कालिमातेच्या भक्तांची जागा गोमाता रक्षकांनी घेतली आहे का? अशा अनेक प्रश्नांच्या भोवती समाजात ठग आणि पेंढाऱ्यांचे तांडव सुरू आहे का? ब्रिटिशांनी अनेक वचने दिली असली तरी त्यात स्वार्थ होता. तो स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व करणाऱ्यांनी पुरे जाणले होते. आताचे शासनकर्त्यांचा स्वार्थ आणि संकुचित राजकारणाचा वास कसा ओळखला जाणार आहे? देश स्वतंत्र होताना जी स्वप्ने पाहिली होती त्यातील काही पूर्णही झाली आहेत, समाज वेगाने बदलतो आहे. आधुनिक तंत्रज्ञान, सर्वांसाठी आरोग्य, विकास, आदी कल्पनाही पुढे आल्या आहेत; पण या सर्व बदलत्या समाजाची नवी स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण जागे व्हायला हवे. पंडित नेहरू म्हणाले होते की, जग गाढ झोपेच्या स्वाधीन असताना आपण जागे राहून नव्या स्वप्नांच्या पूर्ततेचा संकल्प करूया!
आताची स्वप्ने काय असावीत? आपल्या सर्व भारतीयांना कशाचे स्वप्न पडावे आणि त्याच्या पूर्ततेसाठी धडपडण्याची जिद्द एक समाज म्हणून कशी अंगी बाणवावी याचा विचार करणे आवश्यक आहे. नवे तंत्रज्ञान आले, टी.व्ही. आला, मोबाईल आणि अ‍ॅप आले त्याचा सर्वांचा वापर करून समाज मनशुद्धी करणारे वातावरण तयार नाही. त्यामुळे आपण सर्व सैराट झाल्यासारखे वागतो आहोत. वाहने वाढताहेत, पण त्याखाली महाराष्ट्रात वर्षाला बारा हजार लोक ठार होताहेत. प्रत्येकाच्या घरी वाहन आले म्हणजे आपण पुढे गेलो असे वाटत असताना हे वास्तव अधिक भीषण आहे. अन्नधान्याच्या टंचाईवर मात करण्याचे स्वप्न आपण पाहिले ते पूर्ण करताना अभिमान वाटावा अशी स्थिती आहे; पण आता अन्नाची नाही तर पाण्याची टंचाई ही गंभीर समस्या होत आहे. कारण मर्यादित पाण्याचा अमर्याद वापर आणि संवर्धनाच्या गरजेकडे दुर्लक्ष करून एक नवे संकट समोर उभे राहते आहे. जाती-धर्मांच्या तणावातून समाज बंधमुक्त करण्याचेही स्वप्न आपण पाहिले. यासाठी अनेक थोर विभूतींनी लढा दिला. त्यांच्या लढाईची जगाने नोंद घेतली; पण जात-धर्म यांच्या नावाने सत्तेचे राजकारण करण्याचे दिवस काही संपत नाहीत. एवढेच काय तर जाती-धर्माच्या पलीकडे डोकावून इच्छिणाऱ्या तरुणाच्या डोक्यावर वार करायला आपण मागे-पुढे पाहत नाही.
अशा अनेक समस्यांचे ठग-पेंढारी गारुड उभे करीत आहेत. समाजात प्रचंड अस्वस्थता पसरत आहे. त्यावर कोणी आश्वासक भाष्य करेल, संपूर्ण समाजाला पुढे घेऊन जाईल, असे दिसत नाही. त्यामुळेच राष्ट्रीय बँकांना हजारो कोटींची टोपी घालून सहज पळून जाणारे याच देशाचे नागरिक आहेत. दररोज बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा होत नाही. जाती-जातीमध्ये भांडणे लावणाऱ्याला अटकाव होत नाही. आधुनिक भारताची भाषा करताना मुजफ्फरनगरसारखी अमानुष दंगल तीनच वर्षांपूर्वी याच देशाच्या भूमीवर होताना पाहतो आहोत. विकायला काढलेल्या शिक्षणाची महामंदिरेही पाहतो आहोत आणि याच देशात मंदिरे ही व्यापारासाठी उभारण्याची नवी परंपराही सुरू होते आहे, याचेही आपण साक्षीदार बनत आहोत. याचसाठी ठग-पेंढाऱ्यांचा नंगानाच संपविणाऱ्या ब्रिटिशांविषयी जी भावना तयार झाली होती तशी आजच्या वास्तवाकडे वाहून का होऊ नये? शंभर वर्षांपूर्वी बांधलेले पूल वाहून गेल्यावर मृत्यूचे तांडव उभे राहते, तेव्हा आम्हास जाग येते. याची हसतखेळत जबाबदारी घेऊन नवा पूल एकशे ऐंशी दिवसांत बांधण्याचे आश्वासनही दिले जाते. मात्र, संपूर्ण समाजाच्या व्यवस्थेचे आॅडिट करून जुना मोडून नवा समाज उभारण्याचे स्वप्न कसे पूर्ण करणार आहोत? याच पुलाच्या वाहून जाण्यानंतर आठवणीत आले की, आपापल्या गावाजवळचा पूलही शंभर वर्षांचा झाला आहे. त्याचे काय होणार?
कोणत्याही व्यवस्थेचे नीट आॅडिट नाही, फेरमांडणी नाही. नवे निर्माण करण्याचे स्वप्नही स्वार्थाच्या पलीकडे पोहोचत नाही. त्यामुळे स्वातंत्र्याची नवी स्वप्ने पाहण्यासाठी झोपी गेले पाहिजे. म्हणजे शांत अवस्थेत संपूर्ण समाज रचनेचा विचार केला पाहिजे. ती स्वप्ने पाहून तिच्या पूर्ततेसाठी धडपडण्याची जिद्द तयार करायला हवी. पंडित नेहरू काय, सरदार पटेल काय किंवा देशाला खंबीर नेतृत्व देणाऱ्यांनी प्रवाहाच्या विरोधात पोहण्याचे आवाहन केले होते. ती परंपरा जपली पाहिजे. समाजात बंडखोर वृत्ती निर्माण करायला हवी. ते बंड अज्ञान, अंधश्रद्धा, गरिबी, दारिद्र्य, गैरव्यवस्था एवढ्यापुरतेच न राहता, नव्या समाजाच्या नव्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कल्पना घेऊन यायला हवे त्यात समाजाचा सर्वांगीण विकासाचा विचारही हवा. यासाठी स्वातंत्र्याच्या स्वप्नांची नव्याने मांडणी करण्याची गरज आहे.                                                                       ---वसंत भोसले

Web Title: Let the dawn of new dreams of independence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.