त्या सर्व नराधमांना फाशीपर्यंत पोहोचवू

By Admin | Updated: July 20, 2016 06:13 IST2016-07-20T06:13:38+5:302016-07-20T06:13:38+5:30

कोपर्डी; जि.अहमदनगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अनन्वित अत्याचाराचे प्रकरण सरकारने अतिशय गांभीर्याने घेतले आहे

Let all those mischiefs be brought to the death penalty | त्या सर्व नराधमांना फाशीपर्यंत पोहोचवू

त्या सर्व नराधमांना फाशीपर्यंत पोहोचवू


मुंबई : कोपर्डी; जि.अहमदनगर येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अनन्वित अत्याचाराचे प्रकरण सरकारने
अतिशय गांभीर्याने घेतले असून, या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीपर्यंत पोहोचविल्याशिवाय राज्य सरकार स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही देतानाच, या प्रकरणात तातडीने आरोपपत्र दाखल केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
कोपर्डीच्या घटनेवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज वादळी चर्चा झाली. विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करत, अवैध दारूवाल्यांना आळा घालण्याची जोरदार मागणी केली. चर्चेला उत्तर देताना, अवैध दारू तयार करणे आणि विक्रीच्या गुन्ह्यात सध्या तीन वर्षांची शिक्षा दिली जाते. ही शिक्षा दहा वर्षांची करण्याची तरतूद असलेले विधेयक विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मांडण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कोपर्डीतील पीडित मुलीच्या कुटुंबातील महिला आणि गावातील, तसेच परिसरातील महिलांच्या भावना समजून घेण्यासाठी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला त्या ठिकाणी जातील, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकारच्या वतीने अ‍ॅड.ऊज्ज्वल निकम बाजू मांडतील. घटनेचे साक्षीदार नसले तरी डीएनएचा अहवाल पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. या प्रकरणाचा निकाल लवकर लागण्यासाठी ते जलदगती न्यायालयाकडे सोपविण्यात आले असून त्याची सुनावणी नियमित घ्यावी. तिला स्थगिती देऊ नये अशी विनंती उच्च न्यायालयाच्या माध्यमातून जलदगती न्यायालयाला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
कोपर्डीच्या घटनेत आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली असली तरी एका शिंदे नामक व्यक्तीचाही सहभाग असून त्याचा संबंध पूर्वी एका कथित खून प्रकरणाशी असल्याचेही म्हटले जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि चवथ्या व्यक्तीविरुद्धही कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
ही घटना घडल्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षकांनी लगेचच भेट दिली. त्याचबरोबर पालकमंत्री राम शिंदे, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही भेट दिली.
मी आधी रशियाचा दौरा, नंतर आषाढीनिमित्त पंढरपूर, लगेच मुख्यमंत्री परिषदेसाठी दिल्लीला गेल्याने जाऊ शकलो नाही तरीही तेथील प्रत्येक बाबीची जातीने माहिती घेत होतो, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. कोपर्डीतील घटनेच्या निमित्ताने जातीय तणाव निर्माण होऊ नये म्हणून सर्व समाजघटकांनी संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. (विशेष प्रतिनिधी)
>आरोपपत्र तातडीने
न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या प्रमुख पाच डॉक्टरांचे विशेष पथक नेमण्यात आले असून, डीएनए अहवालासह न्यायवैद्यक पुरावे पुढील पाचसहा दिवसांत गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या आधारे आरोपपत्र तातडीने दाखल केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: Let all those mischiefs be brought to the death penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.