आयआयटीयन्सनी दिले शिक्षणाचे धडे!
By Admin | Updated: July 4, 2016 02:25 IST2016-07-04T02:25:34+5:302016-07-04T02:25:34+5:30
ज्ञानाचा प्रसार व्हावा, यासाठी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी मुंबईच्या गरीब वस्त्या गाठून तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले.

आयआयटीयन्सनी दिले शिक्षणाचे धडे!
मुंबई : ज्ञानाचा प्रसार व्हावा, यासाठी आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी मुंबईच्या गरीब वस्त्या गाठून तेथील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिले. शैक्षणिक ज्ञानासोबतच त्यांच्यातील कलागुणांनाही आयआयटीयन्सनी नवी ओळख मिळवून दिली.
आयआयटी मुंबईतर्फे ‘अभ्युदय आयआयटी’ नावाची सेवाभावी संस्था काम करते. या अंतर्गत अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. ही संस्था विद्यार्थ्यांमार्फत चालविली जाते. यंदा ‘वॉलिंटीअर्स वीकेंड’ या उपक्रमांतर्गत आयआयटीचे २० विद्यार्थी अंधेरी पूर्व कॅनोसा शाळा परिसरातील आणि जोगेश्वरी पूर्वेकडील काही चाळींमध्ये गेले होते. तेथील विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासात मदत करीत त्यांना अनेक विषय सोप्या पद्धतीने उलगडून दाखवले. शिवाय प्रत्येक मुलामधील कलागुणांना ओळखून ती कला वाढावी यासाठी त्याविषयीचे मार्गदर्शन केले. आतापर्यंत या दोन विभागांत पाच सत्रे राबविली असून, इतरही वस्त्यांमध्ये उपक्रम करण्याचा आयआयटीयन्सचा मानस आहे. मुलांसोबतच काही काळ वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत घालवण्यासाठी लवकरच नव्या उपक्रमाचे आयोजन आयआयटी अभ्युदय सेवाभावी संस्था करणार आहे. (प्रतिनिधी)