दाढ येथे विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद
By Admin | Updated: July 13, 2016 18:52 IST2016-07-13T18:52:26+5:302016-07-13T18:52:26+5:30
हरणधोंडाई रस्त्यावरील ४५ फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला क्रेनच्या सहाय्याने पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले.

दाढ येथे विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद
ऑनलाइन लोकमत
लोणी (अहमदनगर), दि. 13 - राहाता तालुक्यातील दाढ बु़. येथील चिंचपुरकडे जाणाऱ्या हरणधोंडाई रस्त्यावरील ४५ फूट खोल कोरड्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला क्रेनच्या सहाय्याने पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वन विभागाला यश आले़
दाढ बु़ येथील हरणधोंडाई रस्त्यावर किसन भिकाजी वाकचौरे व सर्जेराव भिकाजी वाकचौरे यांची गट नंबर ३८४ मधील शेतजमिनीत ४५ फुट सामाईक विहिर आहे़ याच विहिरीत मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन वर्ष वयाचा बिबट्या पडला़ विहिर कोरडी असल्याने या विहिरीकडे कुणाचे लक्ष गेले नाही़ याच परिसरातील काही शालेय विद्यार्थी रस्त्याने जात असताना त्यांना विहिरीतुन बिबट्याची डरकाळी ऐकु आली़ तयांनी शेजारी राहणारे पांडुतात्या बनसोडे यांना ही गोष्ट सांगितली़ बनसोडे व दाढचे माजी सरपंच गोरख तांबे यांनी विहिरीकडे धाव घेतली़ विहिरीच्या तळाशी खडकावर बिबट्या असल्याचे त्यांना दिसुन आले़ त्यांनी घटनेची माहिती कोपरगाव विभागाचे वनपाल पी़ आऱ गावडे यांना दिली़ त्यांनी शिर्डी विभागाचे वनरक्षक डी़बी़ झिंजुर्डे व जी़बी़ सुरसे यांना सोबत घेत घटनास्थळ गाठले़ ऐव्हाना बिबट्या विहिरीत पडल्याची वार्ता परिसरात पसरली़ त्यामुळे बघ्यांची गर्दी झाली होती़ लोणी पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरिक्षक बी़व्ही़ शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल ए़डी़ शिंदे, यु़ई़ भोसले, डी़यु़ खैरे यांनी गर्दीवर नियंत्रण मिळविले़ मंगळवारी रात्री अंधार झाल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी क्रेनच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडला़ दिड तासाच्या प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात गेला, त्यानंतर त्याला वर काढण्यात आले़ या बिबट्याला अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले़