कर्नाळ्यात बिबट्या
By Admin | Updated: March 29, 2016 01:50 IST2016-03-29T01:50:56+5:302016-03-29T01:50:56+5:30
पर्यावरणाचा ऱ्हासामुळे वातावरणात बदल होत आहे. त्यातच जंगल नष्ट होत असल्याने जंगली श्वापदांवरही परिणाम होत आहे. नुकताच कर्नाळा अभयारण्यात बिबट्या आढळल्याने

कर्नाळ्यात बिबट्या
- वैभव गायकर, पनवेल
पर्यावरणाचा ऱ्हासामुळे वातावरणात बदल होत आहे. त्यातच जंगल नष्ट होत असल्याने जंगली श्वापदांवरही परिणाम होत आहे. नुकताच कर्नाळा अभयारण्यात बिबट्या आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस ) केलेल्या सर्वेक्षणात हा बिबट्या सीसीटीव्हीत कैद
झाला आहे. कर्नाळा अभयारण्यात रानसई येथे हा बिबट्या आढळला असून त्याने दोन गुरांचा फडशा पाडला आहे.
कर्नाळा पक्षी अभयारण्यात वर्षभर हजारो पर्यटक, पक्षिप्रेमी भेट देत असतात. शिवाय येथील ऐतिहासिक कर्नाळा किल्ला पाहाण्यासाठी अनेकजण येतात. मात्र याठिकाणी बिबट्या आढळल्याने रहिवासी तसेच वनविभागाच्या अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेने अभयारण्यात बसविलेल्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्या कैद झाला आहे. २२ ते २३ मार्च या दोन दिवसात बिबट्या या ठिकाणी फिरताना आढळला.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उरण, पनवेल परिसरातील जंगल नष्ट होत आहे, तसेच मोठ्या प्रमाणात खारफुटीची कत्तल केली जात आहे. त्यामुळे अशाप्रकारे जंगली प्राणी स्थलांतर होत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कर्नाळा अभयारण्याचे वनक्षेत्रपाल पवार यांच्याशी संपर्क साधला असता, बिबट्या स्थलांतरित असण्याची शक्यता असून एकापेक्षा जास्त बिबट्याही याठिकाणी असतील अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
अभयारण्यात मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. १५० पेक्षा जास्त प्रजातीचे पक्षी, ३५ विदेशी स्थलांतरित प्रजातीचे पक्षी याठिकाणी आहेत. तसेच ऐतिहासिक कर्नाळा किल्ल्याचेही आकर्षण आहे. बिबट्या रानसई किल्ल्यापासून दूर आढळला असला तरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पर्यटकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.