वढूमध्ये बिबट्याचा पुन्हा हल्ला, ग्रामस्थ हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2017 01:51 IST2017-05-07T01:51:18+5:302017-05-07T01:51:18+5:30

श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे चाफावाडावस्तीवर शेतात काम करणाऱ्या रतन भंडारे या वृद्धावर बिबट्याने हल्ला केला असून बबन

The leopard again attacked the village, and the villagers shook | वढूमध्ये बिबट्याचा पुन्हा हल्ला, ग्रामस्थ हादरले

वढूमध्ये बिबट्याचा पुन्हा हल्ला, ग्रामस्थ हादरले

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव भीमा : श्रीक्षेत्र वढू बुद्रुक येथे चाफावाडावस्तीवर शेतात काम करणाऱ्या रतन भंडारे या वृद्धावर बिबट्याने हल्ला केला असून बबन भंडारे यांच्यामुळे वृद्ध नागरिकाचा जीव वाचला आहे. वढूमध्ये एका महिन्यात दुसऱ्यांदा बिबट्याने ग्रामस्थांवर हल्ला केल्याने ग्रामस्थांंमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
वनविभाग पिंजरा लावण्यापलीकडे कोणतीच ठोस भूमिका घेत नसल्याने ग्रामस्थांचा जीव गेल्यावरच वनविभाग जागे होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
चाफावाडावस्तीवर सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास रतन शंकर भंडारे (वय ६५) स्वत:च्या शेतात बाजरी काढण्यासाठी गेले असता शेजारील उसातून बिबट्या आला. बिबट्याने रतन भंडारे यांच्या अंगावर उडी मारली व डोक्यावर पंजा मारला. या वेळी बिबट्याच्या पंजाने भंडारे यांच्या डोक्याला मोठी जखम झाली असून त्यानंतर बिबट्याने हाताला, छातीवरही पंजे मारले होते. भंडारे यांच्या गळ्याभोवती टॉवेल असल्यामुळे ते बचावले. दरम्यान, शेजारीच शेतात पाहणी करण्यासाठी आलेल्या बबन भंडारे यांना रतन भंडारे यांचा आवाज आल्याने त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली असता त्यांना भंडारे रक्ताने माखलेले दिसले. बबन भंडारे यांनी त्यांना पाठीवर उचलून बिबट्याकडे पाहिले असता त्यांचीही भीतीने गाळण उडाली. मात्र त्याही परिस्थितीत बबन भंडारे यांनी रतन भंडारे यांना पाठीवरून दूरवर नेल्यामुळे जीव वाचला. याआधी रात्री तीन वाजण्याच्या सुमारास ज्ञानेश्वर भंडारे यांच्या वासराच्या गळ्याला बिबट्याने चावा घेत हल्ला केला होता. मात्र भंडारे यांच्या प्रसंगावधानाने वासराचाही जीव वाचला आहे.
घटना समजल्यानंतर सरपंच रेखा शिवले, उपसरपंच संजय शिवले, माजी सरपंच अंकुश शिवले, ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे, आदींनी पाहणी केली. दरम्यान, शिरूरचे वनअधिकारी एम. जे. सणस यांना घटनेची माहिती मिळाली असता सणस यांच्यासह वनरक्षक ए. बी. पाचपुते, संजय पावणे, वनपाल एस. आर. खट्टे आदींनी त्या ठिकाणी येऊन पाहणी केली. येथे अजून दोन पिंजरे आजच लावण्याच्या सूचना दिल्या. प्रत्येक पिंजऱ्याजवळ दोन कर्मचारी व ग्रामस्थ पाहणी करण्यासाठी सांगितले आहे. ही यंत्रणा सर्व बिबटे जेरबंद होईपर्यंत तैनात राहणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. जे. सणस यांनी सांगितले.

...तर वन विभागाचे अधिकारीच जबाबदार
नोव्हेंबर महिन्यापासून वढू परिसरात बिबट्याने दहशत निर्माण केली असून वनकर्मचारी पिंजरा लावण्या पलीकडेकोणतीच कार्यवाही करीत नसल्याने यापुढे हल्ला झाल्यास वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे सरपंच रेखा शिवले, माजी सरपंच अंकुश शिवले, ग्रामपंचायत सदस्य सचिन भंडारे, रमेश शिवले यांनी सांगितले.


रात्री पिंजऱ्याचे दार कोण उघडणार?
वढू परिसरात बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. पिंजऱ्याचे दार दिवसभर बंद करून रात्री उघडायचे असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी सणस यांनी सांगितले, मात्र रात्री पिंजऱ्याचे दार नक्की उघडायचे कोणी? असा सवाल उपस्थित होत असून वनविभाग पिंजरा लावल्यानंतर त्या ठिकाणी फिरकतच नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

बिबट्याचे हल्ले तर सगळीकडेच होतात
नवीन काय?
बिबट्याचे हल्ले तर सर्वत्रच होत आहेत, त्यात नवीन काय, अशी प्रतिक्रिया वनपाल बी. आर. वाव्हळ यांनी दिल्याने नागरिकांनी संतप्त भूमिका घेत आमचा जीव जाण्याची वाट पाहताय का? असा सवाल केल्यावर वाव्हळ यांची बोलतीच बंद झाली असून वनकर्मचाऱ्यांची ग्रामस्थांप्रती किती उदासीनता आहे, याची जाणीव होत आहे.

Web Title: The leopard again attacked the village, and the villagers shook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.