राज्य वस्तू व सेवा कायद्यासाठी आजपासून विधिमंडळ अधिवेशन
By Admin | Updated: May 20, 2017 02:37 IST2017-05-20T02:37:51+5:302017-05-20T02:37:51+5:30
राज्य वस्तू व सेवा कायद्याला (एसजीएसटी) मंजुरी देण्यासाठी राज्य विधिमंडळाचे तीन दिवसांचे अधिवेशन शनिवारपासून येथे सुरू होत आहे. मुंबई महापालिकेच्या

राज्य वस्तू व सेवा कायद्यासाठी आजपासून विधिमंडळ अधिवेशन
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य वस्तू व सेवा कायद्याला (एसजीएसटी) मंजुरी देण्यासाठी राज्य विधिमंडळाचे तीन दिवसांचे अधिवेशन शनिवारपासून येथे सुरू होत आहे. मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्वायत्ततेवर टाच येणार नाही याची हमी सरकारकडून मिळाली आहे. त्यामुळे बाहेर सरकारवर सडकून टीका करीत असलेली शिवसेना या कायद्याच्या विधेयकास पाठिंबा देणार अशी स्थिती आहे.
वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अलिकडेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन एसजीएसटीबाबतची भूमिका मांडली होती. मुंबई महापालिकेच्या आर्थिक स्वायत्तेवर गदा आणली जाणार नाही, असा शब्द त्यांनी दिल्यानंतर ठाकरे यांनी एसजीएसटीचे विधेयक मंजूर होण्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी सहकार्य करावे, असे आदेश दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.
वित्त मंत्री मुनगंटीवार हे उद्याच्या अधिवेशनात तीन विधेयके सादर करतील. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात जीएसटीला मंजुरी देणे, मुंबई आणि अन्य महापालिकांना भरपाई देणे आणि सध्याचे काही
वित्तीय कायदे रद्दबातल करणे या संबंधीची ही तीन विधेयके
असतील.
सूत्रांनी सांगितले की विरोधकांच्या वतीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे गटनेते माजी वित्त मंत्री जयंत पाटील हे विधानसभेत एसजीएसटीवर भूमिका मांडणार आहेत.