सत्ताधाऱ्यांची रंगली डबा पार्टी
By Admin | Updated: April 8, 2017 04:41 IST2017-04-08T04:41:17+5:302017-04-08T04:41:17+5:30
महापालिका सभागृह नेत्याच्या कार्यालयात विकासकामांच्या बैठकीऐवजी सत्ताधाऱ्यांची ‘डबा पार्टी’ रंगली.

सत्ताधाऱ्यांची रंगली डबा पार्टी
उल्हासनगर : महापालिका सभागृह नेत्याच्या कार्यालयात विकासकामांच्या बैठकीऐवजी सत्ताधाऱ्यांची ‘डबा पार्टी’ रंगली. महापौर मीना आयलानी, उपमहापौर जीवन इदनानी, सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी, अमर लुंड, प्रकाश
माखिजा, प्रदीप रामचंदानी, माजी महापौर आशा इदनानी तसेच पक्षाच्या नगरसेवकांनी हजेरी लावली. पालिकेच्या रीतीनुसार नवनिर्वाचित महापौर पहिल्या दिवशी पालिकेतील विविध विभागांची माहिती घेतात. मात्र, तसे न होता सत्ताधाऱ्यांची डबा पार्टी रंगल्याने त्यावर टीकेची झोड उठली आहे.
उल्हासनगर महापालिकेवर भाजपा-ओमी टीम व साई पक्षाची सत्ता आली. शहर विकासाचे अभिवचन भाजपासह साई पक्षाने नागरिकांना दिले आहे. पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, अर्धवट पडलेल्या योजना, कचऱ्याची समस्या,
डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न, भुयारी गटार योजना, अपुऱ्या पालिका कर्मचाऱ्यांमुळे सर्वच विभागांत उडालेला गोंधळ आदी समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्या समस्या ऐकून सोडवण्याची गरज आहे.
यापूर्वी नवनिर्वाचित महापौर पहिल्या दिवशी सर्वच विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन
पालिकेची आर्थिक व विकासात्मक कामाची माहिती द्यायचे. असा वर्षानुवर्षांचा रीतिरिवाज आहे. याला आयलानी, इदनानी यांनी फाटा दिल्याची टीका पालिका वर्तुळात होत आहे.
महापौर आयलानी दुपारी १२ वाजता पालिकेत आल्या. त्यांनी पालिका परिवहन सेवेच्या अंदाजपत्रकाचा आढावा घेतल्यानंतर विविध विभागांनुसार माहिती घेण्याची पद्धत आहे. आयलानी यांनी तसे केले नाही. सभागृह नेते पुरस्वानी यांनी त्यांच्या कार्यालयात डबा पार्टी ठेवली. त्यासाठी महापौर, उपमहापौरांनी घरून जेवणाचा डबा आणला होता. पार्टीत शहरातील समस्यांऐवजी महापौर निवडणुकीत आपले नगरसेवक कसे फुटण्यापासून वाचले, याचीच चर्चा रंगली होती.
पालिका अधिकारी, कर्मचारी, कामासाठी आलेल्या नागरिकांना ही पार्टी बघून आश्चर्य व्यक्त केले. हा प्रकार पाहता भविष्यात शहराचा कसा विकास होणार याबाबत आलेल्या नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
>ओमी टीम समर्थकांना आमंत्रण नाही
सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी यांच्या कार्यालयात रंगलेल्या पार्टीत भाजपा व साई पक्षाचे नगरसेवक उपस्थित होते. भाजपातील ओमी टीम समर्थक नगरसेवकांना यापासून जाणीवपूर्वक दूर ठेवल्याची टीका होत आहे. ओमी टीमला भाजपातील निष्ठावंत गट व साई पक्षाचे नगरसेवक दूर ठेवत असल्याने त्यांच्यात असंतोष कायम आहे.