विधानपरिषद एकत्रच
By Admin | Updated: October 16, 2015 03:16 IST2015-10-16T03:15:53+5:302015-10-16T03:16:30+5:30
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक गुरुवारी मुंबईत पार पडली. विधानपरिषदेच्या जानेवारीत रिक्त होणाऱ्या आठ जागांसाठी कोणती रणनिती आखायची याची चर्चा या बैठकीत झाली

विधानपरिषद एकत्रच
अतुल कुलकर्णी,मुंबई
काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची एकत्रित बैठक गुरुवारी मुंबईत पार पडली. विधानपरिषदेच्या जानेवारीत रिक्त होणाऱ्या आठ जागांसाठी कोणती रणनिती आखायची याची चर्चा या बैठकीत झाली. एकत्र लढल्यास फायदा होईल ,असा सूर त्यात निघाला.
आजची बैठक प्राथमिक स्वरुपाची होती. सविस्तर मतदारसंघ निहाय बैठक लवकरच घेतली जाईल,असे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. एकत्र लढल्याचा फायदा नक्कीच होईल, त्यामुळेच आम्ही आज बैठक घेतली व एकमत केले, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
मुंबईतून भाई जगताप (काँग्रेस), रामदास कदम (शिवसेना), धुळे-नंदूरबारमधून अंबरीश पटेल (काँग्रेस), कोल्हापूरहून महादेवराव महाडिक (काँग्रेस), नागपूरहून राजेंद्र मुळक (काँग्रेस), सोलापूरहून दिपक साळुंके (राष्ट्रवादी), अकोला-वाशिम-बुलडाणाहून गोपीकिशन बजोरिया (शिवसेना) आणि अहमदनगरहून अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी) अशा आठ जणांची मुदत जानेवारीत संपणार आहे. त्यासाठी डिसेंबरमध्ये निवडणुका जाहीर होतील. आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली.
सध्या या सगळ्या स्थानिक प्राधिकरणांमध्ये कोणत्या पक्षाचे किती बलाबल आहे याचीही चर्चा यावेळी झाली. शिवसेनेच्या दोन, राष्ट्रवादीच्या दोन आणि काँग्रेसच्या चार जागा सध्या आहेत. तर व्यवस्थित नियोजन केले आणि भाजपा शिवसेना दुहीचा फायदा घेतला तर आपण चांगल्या जागा निवडूण आणू शकतो अशी चर्चाही यावेळी झाली.