बेकारीच्या अंधारात पेटविला ‘एलईडी बल्ब’ उद्योगाचा दिवा--जगा वेगळा उद्योजक
By Admin | Updated: January 5, 2016 22:46 IST2016-01-05T22:46:34+5:302016-01-05T22:46:34+5:30
प्रतिकुलतेला केले चितपट : दोन नोकऱ्या गेल्यानंतर साताऱ्यात स्वत:ची कंपनी काढून दिला इतरांनाही रोजगार

बेकारीच्या अंधारात पेटविला ‘एलईडी बल्ब’ उद्योगाचा दिवा--जगा वेगळा उद्योजक
जगदीश कोष्टी--सातारा--घरची बेताचीच परिस्थिती... वडील शेती करत असताना बदली चालक म्हणून खासगी क्षेत्रात काम करत होते... संसाराचा गाडा हाकत असताना वडिलांची होणारी ओढातान न पाहवल्याने त्याने खासगी कंपनीत नोकरी स्वीकारली. पहिली कंपनी बंद पडली... दुसरीत नोकरी स्वीकारली तिही बंद पडली. मग या तरुणानं धाडस दाखवलं अन् स्वत: चीच कंपनी काढून इतरांना रोजगार दिला आहे. बेरोजगारीच्या अंधारात प्रत्येकजण कोठे ना कोठे नोकरी स्वीकारून स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करत असतो. अनेकांना साथही मिळते. सातारा येथील करंजे परिसरात राहत असलेल्या रोहन किर्दत यांच्या बाबतीतही तसेच घडले. महाविद्यालयीन जीवन म्हणजे मौज, मजा, पार्टी करण्याचं वय म्हणून आपणाकडे पाहिलं जातं. पण हेच वय काहीतरी वेगळं करून दाखविण्याचं असतं, हे रोहन किर्दत यांनी हेरलं. अन् नोकरी करण्याचा निर्णय घेतला.
कोणतेही तंत्रज्ञानाचे शिक्षण नसल्याने त्यांना नोकरीत अडचणी होत्या. त्यातून त्यांनी सौरदिवे उत्पादन करण्याच्या कंपनीत नोकरी स्वीकारली. २००८-२००९ दरम्यान, सौरदिव्यांचा वापर वाढविण्यावर, या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाकडून प्रयत्न केले जात होते. अनुदान दिले जात होते. अनेक ग्रामपंचायतींशी करार करून गावात पथदिव्यांच्या ठिकाणी सौरदिवे बसविले जात होते. सर्व व्यवस्थित सुरू असताना ग्रामपंचायतींना पथदिवे पुरविण्याच्या कंपनीच्या यादीतून ते काम करत असलेल्या कंपनीला वगळण्यात आले. त्यामुळे तेथे काम करत असलेल्या सर्वच कामगारांबरोबरच रोहन किर्दत यांच्यावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. त्यानंतर एलईडी ब्लब, ट्यूब, वीज उपकरणे बनविणाऱ्या कंपनीत ते सेल्स मॅनेजर म्हणून नोकरीला लागले. मात्र कंपनी व्यवस्थापनातील अंतर्गत वादावादीमुळे कंपनी बंद पडली. दोन-दोन नोकरी गेल्यानंतर कोणीही मनाने खचला असता. पण सातारा शहरातील या जिद्दी तरुणानं हीच संधी साधून स्वत:ची कंपनी काढण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने माहिती घेण्यास सुरुवात केली. मोना स्कूलजवळ स्वत:चं युनिट तयार केलं. सातारा जिल्ह्यात एलईडी बल्ब बनविणारी पहिली कंपनी काढण्याचा मान त्यांना मिळाला. कंपनीत सध्या सुमारे बारा कर्मचारी कार्यरत आहेत.याठिकाणी सध्या एलईडीवर चालणारे ३ व्हॅटपासून १२ व्हॅटचे बल्ब, दहा व्हॅटपासून ते वीसचे अनुक्रमे दोन व चार फूट लांबीचे ट्यूब लाईट तयार केले जात आहेत.
२०२१ हे वर्षे एलईडीचे असणार
विजेचे दर वाढत चालल्याने कमी विजेवर चालणारे उपकरणे वापरणे क्रमप्राप्त ठरणार आहेत. त्यामुळे एलईडी दिवे, पथदिवे, ट्यूब आदी उपकरणे बनविण्याचा रोहन किर्दत यांनी निर्णय घेतला आहे. २०२१ पर्यंत बहुतांश शहरे एलईडी उपकरणे वापरणारी असणार आहेत. त्यामुळेच भविष्यात अठरा व्हॅट पासून एकशे वीस व्हॅट क्षमतेचे एलईडीवर चालणारे पथदिवेही बनविण्याचा मनोदय आहे.’ अशीही माहिती रोहनने ‘लोकमत’शी बोलताना दिली.