‘ती’ खाती सोडून बोला !
By Admin | Updated: December 1, 2014 03:14 IST2014-12-01T03:14:58+5:302014-12-01T03:14:58+5:30
हिवाळी अधिवेशनापूर्वीच शिवसेनेशी युती होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे सांगत असले, तरी पाच विशिष्ट खाती आणि दोन वैधानिक पदे सोडून काय ते बोला, असा प्रस्ताव भाजपाने ठेवला आहे.

‘ती’ खाती सोडून बोला !
संदीप प्रधान, मुंबई
हिवाळी अधिवेशनापूर्वीच शिवसेनेशी युती होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठामपणे सांगत असले, तरी पाच विशिष्ट खाती आणि दोन वैधानिक पदे सोडून काय ते बोला, असा प्रस्ताव भाजपाने ठेवला आहे. त्यामुळे सत्तेतील शिवसेनेच्या सहभागाचे गाडे पुन्हा अडले आहे.
गृह, नगरविकास, गृहनिर्माण, महसूल, ग्रामविकास ही पाच खाती तसेच विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद ही दोन पदे सोडून बाकीचे काहीही मागा, असा प्रस्ताव भाजपाने शिवसेनेसमोर ठेवला आहे. त्यामुळेच शिवसेनेच्या सत्तेतील सहभागात अडथळा निर्माण झाला आहे. शिवसेनेने हा प्रस्ताव मान्य केला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक होऊन मंत्रिपदे व खाती यांचा निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात आले.
विस्तारानंतर १० मंत्री शिवसेनेचे...
पेट्रोलियम राज्यमंत्री धर्मेंद्र प्रधान व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, तेव्हा ही पाच खाती व दोन पदे सोडून उर्वरित खात्यांची मागणी करण्यास सांगितले. भाजपाच्या सरकारमधील मंत्र्यांची संख्या विस्तारानंतर ३२ असेल व त्यापैकी २२ मंत्री भाजपाचे तर १० मंत्री शिवसेनेचे असतील, असेही प्रधान-पाटील यांनी ठाकरे यांना सांगितले.
सेनेची धार बोथट करण्याची खेळी
हिवाळी अधिवेशनात शिवसेनेच्या विरोधाची धार बोथट करण्याकरिता चर्चेची नौटंकी भाजपाकडून सुरू करण्यात आलेली आहे. भाजपाच्या नेत्यांनी ‘मातोश्री’वर येऊन कोणती चर्चा केली ते स्वत:हून जाहीर करावे, असे मत शिवसेना नेते रामदास कदम यांनी व्यक्त केले.
>शिवसेनेने विरोधी पक्षात बसण्याची मानसिकता स्वीकारली आहे.
मंत्रिमंडळ सहभागाबाबत भाजपा सेनेची फसवणूक करीत आहे.
१९९५च्या फॉर्म्युलानुसार सत्तेचे वाटप झाले पाहिजे, असेही ते म्हणाले.
>शिवसेनेतून मात्र प्रखर विरोध
भाजपाने काय देतो यापेक्षा काय देणार नाही, असा प्रस्ताव सेनेसमोर ठेवल्याने भाजपाकडून कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, असे शिवसेनेचे नेते सतत सांगत आहेत. भाजपाचा
हा नकारात्मक प्रस्ताव मान्य करून उर्वरित खाती स्वीकारण्याची तयारी असेल तरच शिवसेनेचा सत्तेत सहभाग शक्य आहे. तथापि, हा प्रस्ताव स्वीकारण्यास सेनेतून प्रखर विरोध असल्याने शिवसेनेचा सत्ता सहभाग रखडला आहे.
अधिवेशनापूर्वी युती - मुख्यमंत्रीसत्तेतील सहभागासंदर्भात शिवसेनेशी बोलणी सुरू आहेत. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या दृष्टिकोनातूनही धोरणात्मक चर्चा सुरू आहे. हिवाळी अधिवेशनापूर्वीच सेनेशी युती होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जळगाव येथे स्पष्ट केले.
> महत्त्वाची सर्व पदे आधीच भरली
विधानसभा अध्यक्षपद यापूर्वीच भरलेले आहे. त्यामुळे ते पद देण्याचा प्रश्न येत नाही. शिवाय उपमुख्यमंत्रिपद निर्माण न करण्याचे पक्षाचे धोरण असल्याने ते पदही देता येणार नाही, असे भाजपाने स्पष्ट केले आहे.
राज्यांत गृह खाते मुख्यमंत्र्यांकडे असावे हा पक्षाचा आग्रह असल्याने हे खाते देता येणार नाही. नगरविकास-गृहनिर्माण ही खाती मुख्यमंत्र्यांकडेच असणार, ती देणे शक्य नाही.
महसूल खाते एकनाथ खडसे यांच्याकडे असल्याने त्याचाही विचार सोडून द्या. ग्रामविकास खाते भाजपाकडेच राहणार आहे, असे भाजपाने सेनेला बजावले.