लिंगाळीला दोन गटांत जबरी मारहाण
By Admin | Updated: July 11, 2017 00:44 IST2017-07-11T00:44:13+5:302017-07-11T00:44:13+5:30
हॉटेलजवळ झालेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय माने यांनी दिली.

लिंगाळीला दोन गटांत जबरी मारहाण
लोकमत न्यूज नेटवर्क
दौंड : लिंगाळी (ता. दौंड) परिसरातील एका हॉटेलजवळ झालेल्या मारहाणीत चौघेजण जखमी झाले असल्याची माहिती ठाणे अंमलदार दत्तात्रय माने यांनी दिली. याप्रकरणी परस्पर दोन मारहाणीच्या तक्रार दाखल झाल्या आहेत. जयंत चितळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार म्हटले आहे की, रविवार (दि. २) रोजी माझा पुतण्या संदीप चितळे हा त्याच्या मित्रासोबत लिंगाळी हद्दीतील एका हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. दरम्यान, संदीप यास तुटलेली खुर्ची बसण्यास दिली असता हॉटेल मालकाने दोन खुर्च्यांचे सोळाशे रुपये बिल घेतले होते. रविवार (दि.९) रोजी रात्री मी माझा पुतण्या संदीप आणि रणजित टाक व इतर मित्र या हॉटेलवर मालकाला समजून सांगण्यासाठी गेले आणि मालकाला बाहेर बोलावले. तेव्हा मालक तीन ते चार वेटर आमच्याकडे आले आणि दमदाटीची भाषा बोलू लागले. आणि त्याने आमच्याशी धक्काबुक्की करुन सचिन हगारे व संदीप हगारे व १0 ते १२ लोकांनी रॉड, पाईप, चाकू घेऊन आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि हॉटेलमालकानी त्याच्या हातातील कुऱ्हाड मारली. वेटर लोकांनी लोखंडी पाईपने मारहाण केली. या मारहाणीत मी स्वत: संदीप चितळे आणि रणजित टाक यांना जबर मारहाण झाली. हॉटेल मालक संदीप हगारे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, रविवार (दि.९) रोजी रात्रीच्या वेळेला अचानक हॉटेलमध्ये १0 अनोळखी इसम आले आणि त्यातील एक म्हणाला, आम्हाला दारु प्यायची आहे. आम्ही त्यांना हॉटेलमध्ये दारू पिऊ दिली नाही. यातील एकाने माझ्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. तेव्हा माझा भाऊ सचिन हगारे दोघे हॉटेलच्या बाहेर गेलो आणि मोबाईल मागू लागलो. तेव्हा त्याच्यातील काही लोकांनी हातातील लोखंडी कोयत्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली आम्ही त्यांचे वार चुकवले. यावेळी सचिन याच्या हातास कोयता खरचटला आहे. तेव्हा संदीप चितळे, जयंत चितळे, रणजित टाक, भय्या हरदे आणि अन्य काही अज्ञात इसमांनी आम्हास मारहाण केली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.