नेते अन् विद्वान जास्त असल्याने पुणे मागे

By Admin | Updated: May 8, 2017 03:37 IST2017-05-08T03:37:56+5:302017-05-08T03:37:56+5:30

नागपूरचा वेगाने विकास होऊ शकला कारण, नागपुरात नेते अन् विद्वानही कमी आहेत, असे सांगत पुण्यात मात्र नेते आणि विद्वानांची संख्या जास्त

Since the leaders and scholars are very much behind Pune | नेते अन् विद्वान जास्त असल्याने पुणे मागे

नेते अन् विद्वान जास्त असल्याने पुणे मागे

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नागपूरचा वेगाने विकास होऊ शकला कारण, नागपुरात नेते अन् विद्वानही कमी आहेत, असे सांगत पुण्यात मात्र नेते आणि विद्वानांची संख्या जास्त असल्याने इथले विकास प्रकल्प रखडत असल्याकडे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी लक्ष वेधले. या अनुषंगाने त्यांनी पुणेकर राजकारण्यांना आणि स्वयंसेवी संस्थांच्या विद्वानांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘‘प्रथम अध्यक्ष राजर्षी शाहू छत्रपती’’ हा पुरस्कार जनकल्याण समितीला देण्यात आला. त्यावेळी नितीन गडकरी बोलत होते. जलसंधारणाच्या अनुषंगाने नागपूर व विदर्भात करण्यात येत असलेल्या अनेक कामांचे दाखले त्यांनी यावेळी दिले. पुणेकर नेतेमंडळी चर्चा करण्यात आणि वादविवाद करण्यात जास्त वेळ दवडत असल्याने विकासकामांना उशीर होत आहे, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. त्याचबरोबर स्वपक्षातील नेत्यांच्या मतभेदांवरही त्यांनी या निमित्ताने बोट ठेवले.
पुणे व नागपूर यांच्या विकासाची नेहमी तुलना होते. मात्र केंद्रीय मंत्री म्हणून पुणे व नागपूर असा भेदभाव करीत नसल्याचे नितीन गडकरी यांनी यावेळी सांगितले. पुण्यात सध्या सुरू असलेल्या २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम नागपुरात कधीच पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
जेव्हा लातूरला रेल्वेने पाणी दिले जात होते, तेव्हा नागपूरच्या झोपडपट्ट्यांना २४ तास पाणी मिळत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपुरात नेते आणि विद्वान यांची संख्या कमी असल्याने तिथे वेगाने काम होऊ शकतात. मात्र पुण्यात उलटे चित्र असल्याचा चिमटा त्यांनी यावेळी काढला.
पुणे मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव नागपूरच्याही पूर्वी केंद्र शासनाकडे सादर झाला होता. मात्र पुण्यातील नेतेमंडळींचे एकमत होत नसल्याने त्याचा प्रस्ताव १० वर्षे रखडला.
मेट्रो भूयारी असावी की इलिव्हेटेड
या मुद्द्यावरून बरीच वर्षे मेट्रो रखडली. स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनीही याला मोठ्या प्रमाणात विरोध केला.
अखेर पुणे मेट्रोबाबत नितीन गडकरी यांनी दिल्लीत एक
बैठक घेऊन पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्यातील मतभेद मिटवून मेट्रोच्या मार्गातील अडथळे दूर केले होते. नागपूरची मेट्रो काही महिन्यात प्रत्यक्षात धावणार असताना पुणे मेट्रोचे काम आता सुरू झाले आहे.

तुम्हांलाही नगरसेवकांना असेच सांगावे लागेल
‘विकास प्रकल्प ठरला की आम्ही कुणाचेच काही ऐकून घेत नाही. कधीमधी नगरसेवक विरोध करू लागले तर आम्ही त्यांना आमच्या भाषेत समजावून सांगतो. तुम्ही आमचे फोटो वापरून निवडून आलात, याची जाणीव त्यांना करून दिली जाते. नाहीतर पुढच्या तिकीट वाटपावेळी योग्य निर्णय घेतला जातो. मीडिया आणि लोक काय म्हणताहेत, याची चिंता न करता खंबीरपणे निर्णय घेतले जातात. तुम्हांलाही इथल्या नगरसेवकांना असंच सांगावं लागेल’, अशा मिष्किल शब्दांमध्ये नितीन गडकरी यांनी नागपूरमधील त्यांच्या कामाच्या पद्धतीची माहिती दिली.

Web Title: Since the leaders and scholars are very much behind Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.