Raj Thackeray ( Marathi News ) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसेच्या कार्यकर्त्यांचा मुंबईमध्ये मेळावा झाला. या मेळाव्यामध्ये राज ठाकरे यांनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केला. यावेळी त्यांनी बाळासाहेब थोरात यांचे उदाहरण देत महायुतीच्या विजयावर टीका केली. ठाकरे म्हणाले, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात सातवेळा आमदार झाले, आठवी टर्म होती. सातवेळा सत्तर हजार मतांनी निवडून यायचे ते त्यांचा या निवडणुकीमध्ये १० हजार मतांनी पराभव झाला. दरम्यान, आता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी राज ठाकरे यांना काँगेससोबत येण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, यावेळीचा निकाल अनपेक्षित होता. जनतेला सुद्धा हा निकाल अनपेक्षित वाटत आहे. माननीय राज ठाकरे यांनी उल्लेख केला असेल तर यासारखच संशयाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये अनेकांच्या बाबतीत आहे. फक्त माझ्या बाबतीतच असं नाही अनेकांच्या बाबतीत हे वातावरण आहे. मतदान दिसत होतं वेगळं घडलं मात्र वेगळंच, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.
"लोकशाही वाचवणे ही आपली जबाबदारी आहे, लोकशाही मोडण्याचा प्रकार सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून असेल किंवा स्वायत्त संस्थानच्या माध्यमातून लोकशाही मोडण्याचा कार्यक्रम चालला आहे, त्यामुळे लोकशाही वाचवण्यासाठी एका व्यासपीठावर आले पाहिजे, अशी साद काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना दिली आहे.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, प्रत्येक निवडणुकीत मला ५० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य राहिले आहे. या वेळचा निकाल अनपेक्षित होता, जनतेलाही तो अनपेक्षित आहे.राज ठाकरे यांनी माझा उल्लेख केला. माझ्याबाबत नाही तर राज्यात अनेकांच्या बाबतीत हे संशयाच वातावरण आहे. जे दिसतंय ते वेगळं आणि घडलं मात्र वेगळं. या बाबतीत आम्ही अपील देखील केलं होतं. व्हीवीपॅट मोजण्याची मागणी केली होती. पण, ते तयार नाहीत, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.