लोकशाही समृद्ध करणारा नेता गेला...
By Admin | Updated: February 18, 2015 02:11 IST2015-02-18T02:11:44+5:302015-02-18T02:11:44+5:30
अंजनी (ता. तासगाव) येथे आर. आर. पाटील यांच्यावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या शोकसभेत राज्यातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली.

लोकशाही समृद्ध करणारा नेता गेला...
मान्यवरांची आदरांजली : शोकसभेत जागवल्या आबांच्या आठवणी
सांगली : अंजनी (ता. तासगाव) येथे आर. आर. पाटील यांच्यावर मंगळवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी झालेल्या शोकसभेत राज्यातील मान्यवरांनी त्यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, त्यांनी विधानसभेत, अधिवेशनात आजवर जी भाषणे केली, ती जपून ठेवण्यासारखी, राज्याला दिशा देणारी आहेत. अभ्यासू असतानाच, सर्वसामान्यांचा कळवळा असणारे ते नेते होते. आम्हाला त्यांनी खूप काही शिकविले. त्यांचा आवाज कधी सभागृहात किंवा निवडणुकांच्या भाषणात मोठा झाला असेल, तर तो केवळ सर्वसामान्य माणसांसाठीच. व्यक्तिगत प्रश्नांसाठी भांडताना त्यांना मी कधीही पाहिले नाही. माझ्याकडेही त्यांच्या अनेक आठवणी आहेत. आज त्या नजरेसमोर वारंवार येत आहेत.
राष्ट्रवादीचे नेते, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार म्हणाले की, हे वय त्यांच्या जाण्याचे नव्हते. त्यांचे अकाली जाणे हे महाराष्ट्राला धक्का देणारे आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत त्यांच्यासारख्या नेत्याची राज्याला गरज होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर मी त्यांना या गोष्टीची कल्पनाही दिली होती. आजारावर ते मात करतील, अशी आशा होती. त्यांनी राबविलेल्या योजना राज्याच्या राजकीय, सामाजिक इतिहासात कायम स्मरणात राहतील. पक्षीय पदांपासून अगदी मोठ्या खात्याच्या मंत्रिपदापर्यंत ज्या-ज्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविल्या, त्या त्यांनी समर्थपणे पेलल्या. प्रत्येक ठिकाणी काम करताना त्यांनी निष्ठा आणि वेगळेपणा दाखवून दिला. सामान्य माणसांसाठी, दुष्काळी भागासाठी सतत ते कार्यरत होते. म्हणून सामान्य माणसाच्या हिताची जपणूक करण्याचा त्यांनी दिलेला आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व राजकारण्यांनी वाटचाल केली, तरच ती खरी आदरांजली ठरेल.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की, आबांच्या निधनाने राजकारणातील सामान्य माणसाचा आधार हरपला आहे. त्यांचे जीवन, राजकीय कारकीर्द एखाद्या दीपस्तंभासारखे आहे. एखादा मंत्री, एखादा नेता कसा असावा, याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, व्यक्तिगत भूमिका घेऊन ते कधी समोर आले नाहीत. प्रत्येकवेळी सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी ते भांडायचे.
कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले की, विधानसभेतील आमदार, मंत्रीसुद्धा आर. आर. पाटील यांच्या भाषणाने प्रभावित होत असल्याचे मी पाहिले आहे. १९९६ नंतरच्या काळात ज्यावेळी विरोधी पक्षात ते काम करीत होते, त्यावेळी त्यांनी ज्या पद्धतीने सभागृहात आणि राज्यात सामान्यांच्या प्रश्नांबाबत आवाज उठविला, त्याचे चांगले परिणाम १९९९ च्या निवडणुकीत पहावयास मिळाले. त्यावेळेच्या परिवर्तनाला ते कारणीभूत होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
माजी मंत्री नारायण राणे म्हणाले की, आबांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासारखा दुर्दैवी दिवस कोणता नाही. यावेळी शेकापचे आ.गणपतराव देशमुख, महाराष्ट्र एकीकरण समितीचे वसंतराव पाटील, माजी आमदार विलासराव शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले.
आबांच्या अंत्यविधीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आवर्जून उपस्थित होते. लोकशाहीच्या पवित्र मंदिरात पवित्र माणसेच असली पाहिजेत, आबांचे चारित्र्य पवित्र होते, अशा शब्दात पुष्पसुमने वाहताना अण्णांनाही गहिवरून आले होते.
गर्दीला शांततेचे आवाहन करताना स्मिता पाटील म्हणाल्या की, आजवर आबांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर या मतदारसंघातील जनतेने जे प्रेम दिले, ते प्रेम असेच कायम ठेवावे. आबा आपल्याला सोडून गेले असले तरी त्यांचे विचार, त्यांचे कार्य यांचे अस्तित्व आजही आहे. आबांचे विचार जपतानाच त्यांचे कार्य आपण पुढे नेण्यासाठी मदत केलीत, तर तीच खऱ्याअर्थाने त्यांना आदरांजली ठरेल.
अंजनीच्या निवासस्थानी आबांचे पार्थिव पोहोचताच गावात एकच आक्रोश झाला. ‘आबा काय केलंसा हे?’, ‘आम्हासनी फसवून का गेलासा?’ असा हृदय पिळवटून टाकणारे सवाल उपस्थित करतानाच डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंच्या धारांमधून आपल्या लाडक्या नेत्याप्रती त्यांनी प्रेम व्यक्त केले. निवासस्थानापासून अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पार्थिव जाईपर्यंत महिलांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते.