हृदय रुग्णांसाठी ‘लीड लेस पेसमेकर’ ठरतेय वरदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2017 18:08 IST2017-04-09T18:08:44+5:302017-04-09T18:08:44+5:30
आता केवळ एक सेंटीमीटरच्या आकाराचे ‘लीड लेस पेसमेकर’ आल्याने शस्त्रक्रियेची गरज भासत नाही. अधिक प्रगत असलेले हे पेसमेकर तर नैसर्गिक हृदया इतके उत्तम काम करते.

हृदय रुग्णांसाठी ‘लीड लेस पेसमेकर’ ठरतेय वरदान
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - हृदयाशी संबंधित उपचारांमध्ये पेसमेकर बसविणे हा एक महत्त्वाचा उपचार आहे. पेसमेकरचे यशस्वी प्रत्यारोपण (इम्प्लाण्ट) करण्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. परंतु आता केवळ एक सेंटीमीटरच्या आकाराचे ‘लीड लेस पेसमेकर’ आल्याने शस्त्रक्रियेची गरज भासत नाही. अधिक प्रगत असलेले हे पेसमेकर तर नैसर्गिक हृदया इतके उत्तम काम करते. या प्रगत तंत्रज्ञानामुळे रुग्ण त्यांचे नेहमीचे धावपळीचे दैनंदिन जीवन अतिशय समाधानकारक पद्धतीने जगू लागले आहेत, अशी माहिती पद्मभूषण डॉ. एम.खलीलुल्ला यांनी येथे दिली.
कार्डियालॉजीकल सोसायटी आॅफ इंडिया, विदर्भ शाखेच्यावतीने ‘सिक्कॉन-२०१७’ या हृदयरोग व्यवस्थापनेवर आधारीत दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी याच्या उद्घाटनापूर्वी ते ‘लोकमत’शी बोलत होते.
डॉ. खलीलुल्ला म्हणाले, ‘लीड लेस पेसमेकर’ हे पायाच्या नसामधून हृदयात बसविले जाते. यामुळे शस्त्रक्रियेची गरज पडत नाही. याच्या यशाची शाश्वती १०० टक्के आहे. मात्र, हे महागडे उपकरण असल्याने याचा वापर कमी होत आहे. हे उपकरण हृदय रोगाच्या रुग्णांसाठी वरदान ठरू पाहत आहे. या सोबतच ‘डिफेक्टीव्ह हार्ट व्हॉल सर्जरी’ नव्या तंत्रज्ञानाने केली जात आहे. यातही ‘ओपन हार्ट सर्जरी’ करण्याची गरज भासत नाही. पायाच्या नसामधून ‘व्हॉल’ हृदयात बसविला जातो. याचा सर्वाधिक फायदा ज्यांना फुफ्फुसांचा किंवा मूत्रपिंडाचा गंभीर आजार आहे, आणि शस्त्रक्रिया करणे शक्य नाही त्यांना होत आहे. भारतात या नव्या प्रणालीला आता कुठे सुरूवात झाली आहे.
-नवी उपचारप्रणाली ‘मायट्रा क्लीप’
डॉ. खलीलुल्ला म्हणाले, ‘मायट्रल व्हॉल लीक’वर आतापर्यंत ‘ओपन हार्ट सर्जरी’ व्हायची. परंतु आता पायाच्या नसामधून ‘मायट्रा क्लीप’ लावणे शक्य झाले आहे. सध्या ही उपचार पद्धती भारतात उपलब्ध नसलीतरी लवकरच ती उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
- किमती कमी तरी ‘स्टेंट’ची गुणवत्ता कायम
हृदय रोगाच्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरलेली ‘कोरोनरी स्टेंट’च्या व्यवसायातील नफाखोरीला अखेर लगाम लागला आहे. यामुळे आता सात हजारापासून ते ३० हजार रुपयांपर्यंत स्टेंट उपलब्ध आहे. याच्या किमती कमी झाल्या असल्यातरी गुणवत्ता कायम आहे, असेही डॉ. खलीलुल्ला म्हणाले.
दरम्यान परिषदेचे उद्घाटन डॉ. खलीलुल्ला यांच्या हस्ते झाले. यावेळी संघटनेचे आश्रयदाते डॉ. हरीशंकर भार्गव, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अझीज खान, डॉ. राम घोडेस्वार, डॉ. पंकज हरकुट उपस्थित होते.