एलबीटीचा भुर्दंड ग्रामीण जनतेवर का ?
By Admin | Updated: June 4, 2015 04:40 IST2015-06-04T04:40:24+5:302015-06-04T04:40:24+5:30
येत्या १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करून संपूर्ण महाराष्ट्रात व्हॅटवर अधिभार लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

एलबीटीचा भुर्दंड ग्रामीण जनतेवर का ?
मुंबई : येत्या १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करून संपूर्ण महाराष्ट्रात व्हॅटवर अधिभार लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. महापालिकांचे नुकसान भरून काढण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेवर भुर्दंड का, असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रपरिषदेत केला.
धनगर आरक्षणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशीही मागणी त्यांनी केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाने धनगर आरक्षण देण्याची घोषणा केली होती. आता मात्र त्यांच्या सरकारमधील मंत्री धनगरांना आरक्षण देणे शक्य नसल्याची विधाने करीत आहेत. त्यामुळे सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वत: यासंदर्भात स्पष्टीकरण दिले पाहिजे. चेन्नई आयआयटीच्या व्यवस्थापनाने आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल नामक विद्यार्थी संघटनेवर घातलेली बंदी म्हणजे घटनेने दिलेल्या विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा असल्याचे ते म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)