Exclusive; हातांनी अपंग असलेल्या बहिणींने पायाने केली भावाला ओवाळणी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2019 12:43 PM2019-11-01T12:43:16+5:302019-11-01T12:48:29+5:30

भाऊबीज विशेष; ‘वेड्या बहिणीची वेडी माया, ओवाळते मी भाऊराया..’

Laxmi's stubborn steps have led to brother-in-law | Exclusive; हातांनी अपंग असलेल्या बहिणींने पायाने केली भावाला ओवाळणी...!

Exclusive; हातांनी अपंग असलेल्या बहिणींने पायाने केली भावाला ओवाळणी...!

Next
ठळक मुद्देजन्मत: दोन्ही हातांनी अपंग असलेली लक्ष्मी संजय शिंदे ही विडी घरकूलजवळील गोंधळी वस्तीतील लहानशा झोपडीत राहतेआपल्या हातांची उणीव भासू न देता आपल्या पायावर भक्कमपणे उभे राहते़ अथांग जिद्दीच्या जोरावर आयएएस होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी धडपडत आहे

सोलापूर : जन्मत: दोन्ही हातांनी अपंग असलेली लक्ष्मी संजय शिंदे ही विडी घरकूलजवळील गोंधळी वस्तीतील लहानशा झोपडीत राहते़ आपल्या हातांची उणीव भासू न देता आपल्या पायावर भक्कमपणे उभे राहते़ अथांग जिद्दीच्या जोरावर आयएएस होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी धडपडत आहे. ती सध्या जळगावच्या ‘दीपस्तंभ’ या संस्थेत शिकत असून, त्यातूनही वेळ काढून सोलापूरला आली. आपल्या भावासोबत परिसरातील बहीण नसलेल्या भावांची आपल्या पावलांनी औक्षण करून भाऊबीजेची ओवाळणी केली . 

सोलापूरच्या कवी संजीव यांच्या ‘वेड्या बहिणीची वेडी माया, ओवाळते मी भाऊराया..’ या काव्यपंक्तीची प्रचिती पाहायला मिळाली. यंदाचे तिचे तिसरे वर्ष असून, गोंधळी वस्तीतल्या आपल्या झोपडीसमोर सर्व भावंडांना एकत्र करते़ आपल्या पायाच्या मधल्या बोटाने त्यांना गंध लावले़ त्यावर तांदूळ लावले अन् त्यांच्या हातात पांढराशुभ्र रुमाल दिला़ आपल्या दोन्ही पायांनी आरतीने ताट धरत त्यांची ओवाळणी केली. चमचाने त्यांच्या तोंडात साखर भरवली़ या भाऊ-बहिणीच्या अतुट नात्याच्या हृदयस्पर्शी प्रसंगाने उपस्थित सर्वजण भावूक झाले .

जन्मत:च दोन्ही हात नसल्याने तिला शाळेत प्रवेश मिळत नव्हता़ पण रोज वस्तीतल्या शाळेसमोर वर्गाबाहेर जाऊन ती बसू लागली. तेथील विद्यार्थ्यांच्या समूह गीतांसोबत गाणे म्हणू लागली़ केव्हा तरी आपल्याला शाळेत प्रवेश मिळेल या आशेला यश आले. तिच्या वडिलांच्या विनंतीवरून शिक्षकांनी तिला शाळेत प्रवेश दिला. तिने आपल्या अपंगत्वावर मात करीत पायाने लिहिण्यास शिकली. पायाने पेपर लिहून दहावी अन् बारावीची परीक्षा दिली. उत्तम मार्क घेऊन उत्तीर्णही झाली. तिच्या या जिद्दीला साथ देत तिचे आयएएस होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी जळगावच्या यजुवेंद्र महाजन यांनी पुढाकार घेतला. आपल्या ‘दीपस्तंभ’ या संस्थेमार्फत दत्तक घेऊन संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली.

सध्या जळगावला कला शाखेच्या पदवीचा अभ्यास करीत भारतीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. सध्या परीक्षेचे दिवस असून, त्यातून वेळ काढून आपल्या बंधुप्रेमासाठी ती सोलापूरला आली आहे. आपल्या भावना व्यक्त करत परिसरातील भोलेनाथ,आबासाहेब, विशाल वाघमारे या भावांची आपल्या पायांनी गंध लावून,औक्षण करून ओवाळणी केली. त्यांच्या तोंडात साखर भरविली, त्यांच्या हातात दिलेला रुमाल न्याहळत त्यातच हरवून गेले होते. या बंधूंनी आपल्या कुवतीनुसार आणलेल्या खाऊची रक्कम ओवाळणी देत लक्ष्मीच्या पाया पडून आशीर्वाद घेतला.

तिला व्हायचंय जिल्हाधिकारी .....

  • - आपल्या व्यंगावर मात करीत ती आपली सर्व कामे स्वत:च्या पायांनी करते़ तिने कविता करण्याचा, चित्रे काढण्याचा छंद जोपासला आहे. निसर्गचित्रे काढणे तिला जास्त आवडते. त्यासोबतच स्वयंपाक करणे, धुणी-भांडीसुद्धा करते़ ती सोशल मीडियावरसुद्धा सतर्क असते. 
  • - नवनवीन लोकांशी मैत्री करणे तिला फार आवडते. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने महाराष्ट्रात सर्वत्र लोकसंग्रह जमविला आहे. त्यांच्यासोबत कौटुंबिक, जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित केले आहे. त्यांच्याशी वैचारिक आदानप्रदान करते़ यामध्ये राज्यातील आयएएस,आयपीएस अधिकारी आहेत. जिल्हाधिकारी होण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिची धडपड चालू आहे .

मार्च-२०१५ मध्ये दहावीची परीक्षा पायांनी लिहून दिली़ ‘लक्ष्मीच्या पावलांनी सरस्वतीची उपासना’ या मथळ्याखाली सर्वप्रथम ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले. त्या बातमीने मला प्रेरणा मिळाली. आयुष्यात काहीतरी वेगळे करण्याची जिद्द उराशी बाळगून प्रयत्नशील आहे़ कला शाखेच्या पदवीसोबत यजुवेंद्र महाजन यांच्या ‘दीपस्तंभ’ संस्थेच्या मदतीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करीत आहे. ‘लोकमत’मुळे मी प्रकाशात आले़ माझे जिल्हाधिकारी होण्याचे स्वप्नसुद्धा पूर्ण होईल़
- लक्ष्मी संजय शिंदे

Web Title: Laxmi's stubborn steps have led to brother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.