सोसायटीला प्रभाग रचनेची लक्ष्मणरेखा
By Admin | Updated: January 21, 2017 02:58 IST2017-01-21T02:58:04+5:302017-01-21T02:58:04+5:30
एकाच सोसायटीत राहणारे रहिवासी प्रभाग रचनेच्या लक्ष्मणरेखेमुळे दोन भागांत दुभागले गेल्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडला

सोसायटीला प्रभाग रचनेची लक्ष्मणरेखा
मुंबई : एकाच सोसायटीत राहणारे रहिवासी प्रभाग रचनेच्या लक्ष्मणरेखेमुळे दोन भागांत दुभागले गेल्याचा प्रकार मुलुंडमध्ये घडला आहे. येथील मतदार प्रभाग क्रमांक १०५ आणि १०६मध्ये दुभागले गेले आहेत. यापैकी बहुतेक रहिवासी याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.
मुलुंड पूर्वेकडील नीता अपार्टमेंटमधील मतदार सध्या या नवीन वॉर्ड रचनेमुळे दोन प्रभागांत दुभागले गेले आहेत. नीता अपार्टमेंटच्या ‘एबी’,‘सीडी’ आणि ‘ईएफ’ अशा तीन विंग आहेत. यात एबी आणि सीडीमध्ये प्रत्येकी ६० फ्लॅट्स आहेत. तर ईएफमध्ये ४५ फ्लॅट्स आहेत. एबी आणि सीडीच्या मधूनच चाफेकर बंधू मार्ग गेल्यामुळे या दोन इमारतींचा समावेश प्रभाग क्रमांक १०६मध्ये आहे. हा प्रभाग उत्तरेकडे चाफेकर बंधू मार्ग, पूर्वेकडे ठाणे खाडी, दक्षिणेकडील टी व एस विभाग सामाईक सीमा व पश्चिमेकडे मध्य रेल्वे लाइन्स सीमेअंतर्गत बंदिस्त केलेला आहे. सदर प्रभाग पालिकेच्या नव्या धोरणानुसार हरिओम नगर, म्हाडा कॉलनी, डम्पिंग सॉल्ट लेक, टाटा कॉलनी, नवघर विभागांचा मिळून बनविलेला आहे. यामध्ये जुन्या १०० प्रभागातील हरिओम नगर, म्हाडा कॉलनी, टाटा कॉलनी आदी विभाग नव्याने समावेश केलेले आहेत.
तर दुसरीकडे ‘ईएफ’ आणि ‘सीडी’ या विंगचा काही भाग संत रामदास रोडच्या दिशेने गेला आहे. रामदास रोडचा समावेश १०५मध्ये गेला असल्याने या मतदारांचा समावेश १०५मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे एकाच सोसायटीच्या मतदारांना दोन वेगवेगळ्या प्रभागांत मतदान करावे लागणार आहे.