संरक्षणासाठी कायदा, तरीही होतात हल्ले

By Admin | Updated: July 1, 2016 02:03 IST2016-07-01T02:03:54+5:302016-07-01T02:03:54+5:30

डॉक्टरांवर हल्ले होऊ लागल्याने सरकारला ‘डॉक्टर संरक्षण कायदा’ करावा लागला.

Laws for protection, attacks still occur | संरक्षणासाठी कायदा, तरीही होतात हल्ले

संरक्षणासाठी कायदा, तरीही होतात हल्ले


पिंपरी : डॉक्टरांवर हल्ले होऊ लागल्याने सरकारला ‘डॉक्टर संरक्षण कायदा’ करावा लागला. कायदा अंमलात येऊन तीन वर्षे उलटली, तरी डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रमाण कमी झालेले नाही. एकीकडे रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरांना देव मानले जात असताना, दुसरीकडे त्यांच्यावरच हल्ले होतात. डॉक्टरांबद्दलची भावना अलीकडच्या काळात बदलली असून, त्यांच्याविषयीची विसंगती दूर करण्यासाठी प्रतिमा बदलण्याचे आव्हान डॉक्टरांपुढे आहे.
निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावला, असे आरोप डॉक्टरांवर केले जातात. अनेकदा रुग्णांचे नातेवाईक तसेच संतप्त नागरिक डॉक्टरांवर धावून जातात. प्रसंगी मारहाण करतात. जमावाने येणाऱ्या नातेवाइकांना तोंड देणे कठीण होते. डॉक्टरांवर हल्ले होतात, म्हणून कायदा झाला. आता कायदा होऊनही हल्ले होत असतील, तर हल्ला करणाऱ्यांची मानसिकता बदलण्याची गरज आहे, अशा भावना ‘डॉक्टर्स डे’निमित्त डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
डॉक्टर संरक्षण कायदा २०१३ला लागू झाला. डॉक्टर म्हणजे पैशासाठी लोभी माणूस, अशी प्रतिमा समाजात तयार होत आहे. नागरिकांची ही मानसिकता बदलणे आवश्यक आहे. डॉक्टरांविषयी आपुलकी, आदरभाव त्यांच्या मनात निर्माण होणे आवश्यक आहे. हल्ल्यांसाठी डॉक्टर टार्गेट होऊ लागले, तर उपचारासाठी कोणाकडे जाणार, हे त्यांच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे, असे मत पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय गव्हाणे यांनी व्यक्त केले.
विविध रुग्णालयात येणारा वैद्यकीय उपचाराचा खर्च हा वेगवेगळा असतो. हा खर्च त्या रुग्णालयातील सेवा, सुविधांवर आधारित असतो. परंतु, रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक ते मान्य करत नाहीत. अनेकदा बिलावरून वाद होतात. रुग्ण दगावल्यास डॉक्टरांना जबाबदार धरले जाते. कोणीही डॉक्टर रुग्णाच्या जिवाशी खेळणार नाही. आजाराचे स्वरूप, उपचार करतेवेळी उद्भवणारी परिस्थिती याचा विचार केल्यास रुग्णाच्या नातेवाइ्कांकडून असे प्रकार घडणार नाहीत.
डॉक्टर ही एकमेव व्यक्ती आहे की, ती २४ तास सेवा देत असते. मात्र, रुग्ण डॉक्टरांच्या अडचणींचा विचार करत नाही. डॉक्टरांचेच मानसिक संतुलन बिघडत चालले आहे. डॉक्टर प्रमाणिक सेवा देण्याचे काम करतात. मात्र, काही मंडळी डॉक्टरांच्या सेवेमध्ये अडथळा आणण्याचा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात. कुटुंब सदस्य म्हणून डॉक्टरांना मान मिळायला हवा, तरच डॉक्टरांवरील हल्ले कमी होतील, असेही मत डॉक्टरांनी व्यक्त केले.
>शासकीय सेवेतील डॉक्टरांना रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकडून होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांना त्याची झळ अधिक पोहोचते. घटना घडल्यानंतर संघटनेकडून केवळ निषेध नोंदवला जातो.
वैद्यकीय व्यवसायाला ग्राहक संरक्षण कायदा लागू झाल्यामुळे डॉक्टरांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागते. रुग्णांचे ७० टक्के उपचार हे खासगी रुग्णालयात होतात. छोटी चूकसुद्धा डॉक्टरांना महागात पडते. त्यामुळे डॉक्टर दक्षता घेत असतात. अगदी निष्काळजीपणे ते रुग्णांना हाताळतात, अशा आरोपांमध्ये तथ्य नाही.
- डॉ. रोहिदास आल्हाट

Web Title: Laws for protection, attacks still occur