कायदा, सुव्यवस्थेवर भर
By Admin | Updated: August 1, 2016 04:39 IST2016-08-01T04:39:12+5:302016-08-01T04:39:12+5:30
राज्यात कायदा व सुुव्यवस्था कायम राखण्यावर भर राहील, त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविल्या जातील

कायदा, सुव्यवस्थेवर भर
मुंबई : राज्यात कायदा व सुुव्यवस्था कायम राखण्यावर भर राहील, त्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविल्या जातील, अशी ग्वाही नूतन पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी रविवारी दिली. पोलीस मुख्यालयात दुपारी मावळते डीजीपी प्रवीण दीक्षित यांच्याकडून कार्यभार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते.
राज्याचे ४०वे पोलीसप्रमुख बनलेले माथुर हे १९८१च्या आयपीएस बॅचचे ‘टॉपर’ आहेत. शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नियुक्तीची घोेषणा केली. सेवानिवृत्तीपर्यंत त्यांना २२ महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे.
रविवारी दुपारी मुख्यालयात पदभार स्वीकाण्याबाबतची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले, राज्यातील कायदा-सुव्यवस्था सुरळीत राखणे, प्रत्येक नागरिकाला सुरक्षिततेची हमी देणे यावर आपला विशेष भर असेल. तूर्तास त्याबाबत आपण अधिक भाष्य करू इच्छित नाही. गेल्या साडेतीन दशकांपासून पोलीस दलात कार्यरत असलेले माथुर यांची मितभाषी व शिस्तप्रिय म्हणून ख्याती आहे. पदोन्नतीवर विधि व तंत्रज्ञ (एल अॅण्ड टी) विभागाचे पहिले महासंचालक बनण्याचा मान त्यांना मिळाला. त्यानंतर पोलीस गृहनिर्माण व कल्याणनिधी विभाग तर गेल्या २५ एप्रिलपासून ते एसीबीचे प्रमुख होते.
पदभार ग्रहण समारंभाला पोलीस मुख्यालयात अपर महासंचालक राजेंद्र सिंह, बिपीन बिहारी, लक्ष्मीनारायण, प्रज्ञा सरवदे, विशेष महानिरीक्षक डॉ. रवींद्र सिंघल, कैसर खालीद, अर्चना त्यागी, राजकुमार व्हटकर, अधीक्षक प्रकाश वाडकर आदी उपस्थित होते. मावळते पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना सलामी देऊन निरोप देण्यात आला. (प्रतिनिधी)
>बॉम्बस्फोट तपासात महत्त्वाची भूमिका
उपायुक्त म्हणून कार्यरत असताना त्यांनी १९९३च्या बॉम्बस्फोट तपासात विशेष महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती.
वाहतूक शाखेत सहआयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.
याव्यतिरिक्त प्रतिनियुक्तीवर सीबीआय, अपर महासंचालक (अस्थापना) त्याचप्रमाणे पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी समर्थपणे जबाबदारी सांभाळली आहे.