‘कायदा सुव्यवस्था’ व आस्थापना शाखेला प्रमुखच नाही
By Admin | Updated: June 29, 2016 05:20 IST2016-06-29T05:20:27+5:302016-06-29T05:20:27+5:30
पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रकरणे हाताळण्यासाठी पूर्णवेळ वरिष्ठ आयपीएस अधिकारी ही दोन पदे गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त आहेत.

‘कायदा सुव्यवस्था’ व आस्थापना शाखेला प्रमुखच नाही
जमीर काझी,
मुंबई- राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रकरणे हाताळण्यासाठी पूर्णवेळ वरिष्ठ आयपीएस अधिकारी ही दोन पदे गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त आहेत. सध्या हा कारभार अन्य अधिकाऱ्यांमार्फत चालविला जात आहे. पोलीस महासंचालकांनंतर मुख्यालयातील महत्त्वाचे पद समजले जाणारे कायदा व सुव्यवस्था आणि आस्थापना विभागाच्या अप्पर महासंचालकांच्या जागा रिक्त आहेत.
भाजपा- शिवसेनेतील वाढत्या कलहामुळे ‘लॉ अॅण्ड आॅर्डर’चा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता गुप्तवार्ता विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. अशीच परिस्थिती पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या हाताळणाऱ्या आस्थापना विभागात आहे. गेल्या १३ मे पासून ‘लॉ अॅण्ड आॅर्डर’ आणि आस्थापना विभागाचे अप्पर महासंचालक पद रिक्त आहे. सध्या या पदाचा तात्पुरता कार्यभार अनुक्रमे अप्पर महासंचालक (नियोजन व समन्वय) लक्ष्मीनारायण व पोलीस प्रशासन विभागाच्या प्रमुख प्रज्ञा सरवदे यांच्याकडे आहे.
सेवा ज्येष्ठतेनुसार आस्थापना विभागाचे प्रमुख व्ही.डी.मिश्रा यांची १३ मे रोजी महासंचालकपदी पदोन्नती होवून पोलीस गृहनिर्माण व कल्याणनिधीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. तर त्यांच्यानंतर ज्येष्ठ असलेल्या ‘लॉ अॅण्ड आॅर्डर’चे अप्पर महासंचालक के. एल. बिष्णोई यांची गृहनिर्माण विभागात बदली करण्यात आली. त्यानंतर या पदांवर पूर्णवेळ अधिकारी नेमण्यात आलेला नाही. वास्तविक मुख्यालयात पोलीस महासंचालकानंतर ‘लॉ अॅण्ड आॅर्डर’चे पद महत्त्वाचे समजले जाते. राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी त्यांच्याकडून विशेष उपाययोजना राबविल्या जातात. अनेकवेळा ‘डीजीपी’ राज्याबाहेर अथवा किरकोळ रजेवर असल्यास मुख्यालयाचा तात्पुरता कार्यभार त्यांच्याकडे सोपविला जातो. आस्थापना विभागातही अशीच परिस्थिती आहे.
यावर्षी पोलीस निरीक्षकांच्या सर्वसाधारणबदल्यांच्यावेळी तब्बल ७२ अधिकाऱ्यांच्या मुदतपूर्व बदल्या करण्यात आल्या. या अन्यायाविरुद्ध बहुुतांश अधिकाऱ्यांनी ‘मॅट’मध्ये स्थगिती घेतल्याने महासंचालकांना नामुष्की पत्करावी लागली. त्यामुळे पीएसआय ते निरीक्षक दर्जापर्यंतच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे नियोजनाची जबाबदारी असलेले पद प्रभारी अधिकाऱ्याकडून चालविले जात
आहे.
>गुप्त वार्ता विभागाचा इशारा
माधव भंडारी यांच्या लेखानंतर शिवसेनेत संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे त्याबाबत मासिक, नेत्यांचे पुतळा दहन रास्तारोको बरोबरच हिंसक आंदोलन होण्याची शक्यता गुप्तवार्ता विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे माधव भांडारी यांची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. सध्या त्यांच्या निवासस्थानी पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
>बक्षी यांचा प्रतिक्रियेस नकार : नियुक्ती रखडण्यामागील कारणाबाबत अप्पर मुख्यसचिव (गृह) के.पी.बक्षी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
>नियुक्त्या गृह विभागाकडून : दोन्ही पदांची नियुक्ती गृह विभागाकडून केली जाते. त्यामुळे त्याबाबत मी काही बोलू शकत नाही. सध्या या पदाचा अतिरिक्त कारभार अन्य अधिकाऱ्यांकडे असला तरी त्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडलेला नाही.
-प्रविण दीक्षित (पोलीस महासंचालक)