‘मिशन देवगड २0२५’चा शुभारंभ

By Admin | Updated: October 9, 2014 23:06 IST2014-10-09T21:47:56+5:302014-10-09T23:06:30+5:30

नीतेश राणे यांची माहिती : पुढील दहा वर्षांचा वेध व्हिजनद्वारे जनतेसमोर

Launch of 'Mission Devgad 2025' | ‘मिशन देवगड २0२५’चा शुभारंभ

‘मिशन देवगड २0२५’चा शुभारंभ

देवगड : तालुक्याच्या भविष्यातील पुढील दहा वर्षांच्या विकासाच्या वाटचालींचा वेध घेण्याचा ‘व्हिजन देवगड’ या चित्रफितीमध्ये प्रयत्न केला असून त्यावर आधारीत ‘मिशन देवगड २०२५’ हा कृती आराखडा आपण तयार केला आहे, असे प्रतिपादन स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नीतेश राणे यांनी केले. येथील इंद्रप्रस्थ सभागृहात बुधवारी रात्री यासाठी खास आयोजित सभेमध्ये नीतेश राणे बोलत होते.
राणे म्हणाले, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नसून ते मतदारांसाठी आश्वासनही नाही. माझे ठाम मत व कार्यपद्धती मी या चित्रफितीद्वारे समोर ठेवली आहे, असे म्हणाले. यावेळी डॉ. मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष प्रकाश राणे व बाळा खडपे आदी उपस्थित होते. या चित्रफितीचे उद्घाटन नीतेश राणे यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. चित्रफितीची निर्मिती प्रख्यात निर्माते व कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी केली असून त्यांचे विशेष आभार राणे यांनी मानले.
आपल्या व्हिजन डॉक्युमेंटरीचा संबंध राजकारणाशी नाही. मतदारांना खुष करण्यासाठी हा उपद्व्याप नाही. आपण आपले ठाम मत या आराखड्याद्वारे जनतेसमोर ठेवले आहे. विधानसभा निवडणूक ही केवळ एक संधी आहे व त्याचा साधन म्हणूनच मी विकासात्मक कार्यक्रम राबविण्यासाठी वापर करीन, असेही मत नीतेश राणे यांनी मांडले.
पालकमंत्री नारायण राणे यांनी पायाभूत सुविधा निर्मितीसाठी कार्यक्रम राबवला. त्याचा पुढील टप्पा म्हणून पुढील पाच ते दहा वर्षे या देवगड तालुक्यासाठीच्या स्वतंत्र व्हिजन डॉक्युमेंटरीचा मी आदर्श म्हणून उपयोग करीन.
आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी देवगड मिशन २०२५ या आराखड्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे स्वप्न दाखविणे यापेक्षा कार्य करून त्यांची पूर्तता करून दाखविणे हे प्रथम कर्तव्य असून कार्यकर्त्यांनाही माझा हाच संदेश असल्याचे त्यांनी सांगितले.
हा आराखडा राबविण्यासाठी सरकारी निधीचीच केवळ आवश्यकता आहे असे नसून आमदारांची इच्छाशक्ती, जिद्द व प्रयत्न हेच महत्त्वाचे आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार कुठे कमी पडले, याचे विवेचनही या निमित्ताने जनताच करणार असल्याचेही राणे म्हणाले. प्रास्ताविकामध्ये डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी, मिशन देवगडचे महत्त्व, उद्देश व पूर्ती याबाबत माहिती दिली. यावेळी देवगडमधील बहुसंख्य व्यावसायिक, प्रतिष्ठीत नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते. आभार मिलिंद कुलकर्णी यांनी मानले. यावेळी देवगड तालुक्यातील आणि शहरातील प्रतिथयश डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, जाणकार मंडळी आणि काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

विस्तृत कार्यक्रम
चित्रफितीमध्ये देवगडचा अप्रतिम निसर्ग, फळफळावळ, मासळी व समुद्र संपत्ती, आंबा पीक, कातळावरची बागायती, विजयदुर्ग किल्ला व बंदरे, सांस्कृतिक व धार्मिक वारसास्थळे यांचे विवेचन करण्यात आले आहे. या सर्वांच्या विकासासाठी पर्यटन विकास, फळप्रक्रिया, मत्स्य प्रक्रिया केंद्रे, सौरऊर्जा व पवन ऊर्जा केंद्र, बंदर विकास व धार्मिक स्थळांचा विकास याबाबत आपण काय कार्यक्रम राबविणार याबाबत नीतेश राणे यांनी विस्तृत चर्चा केली. त्यानंतर विचारलेल्या प्रश्नांनाही दिलखुलास उत्तरे दिली.

Web Title: Launch of 'Mission Devgad 2025'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.