लातूरच्या पाण्यावरून खडाजंगी
By Admin | Updated: April 8, 2016 03:32 IST2016-04-08T03:32:39+5:302016-04-08T03:32:39+5:30
लातूर शहरात उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईचे पडसाद गुरुवारी विधानसभेतही उमटले. लातूरला आठ वर्षे मुख्यमंत्रिपद होते; अनेक वर्षे मंत्रिपद मिळाले तेव्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सोडविला नाही

लातूरच्या पाण्यावरून खडाजंगी
मुंबई : लातूर शहरात उद्भवलेल्या भीषण पाणीटंचाईचे पडसाद गुरुवारी विधानसभेतही उमटले. लातूरला आठ वर्षे मुख्यमंत्रिपद होते; अनेक वर्षे मंत्रिपद मिळाले तेव्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सोडविला नाही, असा सवाल महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी काँग्रेस नेत्यांना करताच प्रचंड गदारोळ झाला. शेवटी, खडसे यांनी माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख मागे घेत लातूरला १५ दिवसांत रेल्वेने पाणीपुरवठा केला जाईल, असे सांगितल्याने विरोधक शांत झाले.
काँग्रेसचे अमित देशमुख यांनी लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे नागरिक स्थलांतर करीत असल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर पाण्याअभावी स्थलांतर झालेले नाही, असा दावा खडसे यांनी केला. त्याला विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदींनी तीव्र आक्षेप घेतला. ज्या नेतृत्वाबाबत खडसे आरोप करीत आहेत त्यांनीच मांजरा बॅरेज बांधले, लातूर शहराचा विकास केला. तसा विकास खडसेंनी जळगावचा करून दाखवावा, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी केला; तर जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी लातूरमध्ये काँग्रेसच्या हातातील पालिका पाणी विकत असल्याचा आरोप केला.
>लातूरला आठ वर्षे मुख्यमंत्रिपद होते; अनेक वर्षे मंत्रिपद मिळाले तेव्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न का सोडविला नाही, असे विचारत मांजरा सहकारी साखर कारखान्यासाठी पाणी नेल्याने आज भीषण टंचाईची परिस्थिती असल्याचे खडसे यांनी सांगताच विरोधी पक्षाचे सदस्य चांगलेच संतप्त झाले. वेलमध्ये उतरून त्यांनी एकच गदारोळ केला. त्याचवेळी भाजपाचे संभाजी पाटील निलंगेकर यांनी ४० वर्षांत काँग्रेसने काय केले, असा सवाल केला, तेव्हा त्यांची काँग्रेसचे अमिन पटेल आदींशी खडाजंगी झाली.
> पहिल्या सामन्याचा
मार्ग मोकळा
राज्यात पाणीटंचाईचा भीषण प्रश्न सतावत असताना आयपीएलच्या सामन्यांसाठी स्टेडियमवर होणाऱ्या पाण्याच्या उधळपट्टीवरून दाखल केलेल्या जनहित याचिकेवर मुंबई क्रिकेट असोसिएशनला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. - वृत्त/२
> औरंगाबादचे बीअरचे कारखाने बंद करा - सत्तार
औरंगाबादमधील बीअर कारखान्यांमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने किमान आगामी तीन महिन्यांसाठी हे कारखाने बंद ठेवण्याची मागणी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत शून्य तासात केली. जवळपास ३२ एमएलडी पाणी हे कारखाने वापर असल्याचे सत्तार यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे सांगितले.
> गांभीर्याने वागा - सुप्रीम कोर्ट : दुष्काळाशी सामना करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांबद्दलची माहिती देण्यासाठी आज केंद्र सरकारच्या वकील (अतिरिक्त सॉलिसिटर जनरल) सर्वोच्च न्यायालयात १५ मिनिटे उशिरा पोहोचल्या. यामुळे न्यायाधीशांनी त्यांना रागातच विचारले की, ‘आम्ही रिकामटेकडे आहोत का? कमीतकमी याबाबतीत तरी काही गंभीरता दाखवा.’ - वृत्त/९
> रेल्वेमंत्री
सुरेश प्रभू
यांनी दोन मालगाड्या पाणीपुरवठ्यासाठी दिलेल्या आहेत. गरजेनुसार आणखी गाड्या मिळतील. बाजूच्या तेलंगणामधून पाणी देण्याची आमची तयारी असल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्री निर्मला सीतारामन यांनी मला सांगितले आहे.
- एकनाथ खडसे
> आघाडी सरकारच्या काळात केवळ वर्षभरात १२० किमीची पाइपलाइन टाकून उस्मानाबाद शहराला पाणी पुरवून समस्या कायमची सोडविली. आपल्या सरकारने लातूरसाठी असे पाणी उजनी धरणातून का आणले नाही. - पृथ्वीराज चव्हाण