दुस-या दिवशी लेटमार्क
By Admin | Updated: October 9, 2014 04:52 IST2014-10-09T04:52:47+5:302014-10-09T04:52:47+5:30
चिपळूणजवळ मालगाडीचे डबे घसरले आणि कोकण तसेच त्यामार्गे जाणा-या मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा बो-या वाजला.

दुस-या दिवशी लेटमार्क
मुंबई : चिपळूणजवळ मालगाडीचे डबे घसरले आणि कोकण तसेच त्यामार्गे जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा बोऱ्या वाजला. या घटनेनंतर सलग दुसऱ्या दिवशी बुधवारीही लांब पल्ल्याच्या गाड्या विस्कळीतच होत्या. अनेक गाड्यांना लेटमार्क लागला, तर दोन गाड्या रद्द केल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाल्याचे चित्र कोकण रेल्वे मार्गावर होते. तब्बल ३२ तासांनंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला असून या मार्गावरून मुंबई मेंगलोर एक्स्प्रेस ही गाडी पहिली गेली.
मंगळवारी सकाळी चिपळूण खेर्डीजवळ मालगाडीचे डबे घसरले. यामुळे अनेक गाड्या रद्द करण्याबरोबरच काही गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या. यामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून रत्नागिरी आणि चिपळूणवरून एसटी महामंडळाच्या जादा बसेस सोडण्यात आल्या. बुधवारीही हीच परिस्थिती कोकण रेल्वेमार्गावर दिसून आली. घटनास्थळी काम सुरू असल्याने अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. तर काही गाड्यांना दोन ते तीन तासांचा लेटमार्कही लागत होता. त्यामुळे प्रवाशांकडून याबाबत रोष व्यक्त केला जात होता. दरम्यान, ३०० पेक्षा जास्त कामगारांच्या मदतीने कोकण रेल्वेकडून डबे हटवण्याचे काम केले जात होते. अपघात ज्या भागात घडला त्या भागात १६० मीटरपर्यंत रेल्वे रुळाला समस्या झाल्याने नवा ट्रॅक टाकण्याचे कामही सुरू होते. घसरलेल्या मालगाडीच्या प्रत्येक डब्यात गव्हाच्या गोण्या असल्याने सुरुवातीला डब्यातून या गोण्या बाहेर काढून डबा हटवण्याचे काम केले जात होते. असे तब्बल एकूण ७५० टन वजनाच्या १५ हजार गोण्या हटवण्यात आल्या. त्यानंतर डबे हटवून तुटलेल्या रेल्वे रुळाचे काम त्वरित हाती
घेण्यात आले. काम पूर्ण झाल्यानंतर बुधवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास रेल्वे मार्ग पूर्ववत झाला आणि त्याच्या सात मिनिटांनंतर या मार्गाला ट्रॅक सुरक्षित असल्याचे सर्टिफिकेट देण्यात आले. (प्रतिनिधी)