उशिरा आलेल्या विद्यार्थ्यास शौचालय साफ करण्याची शिक्षा!

By Admin | Updated: October 13, 2016 03:06 IST2016-10-13T03:06:10+5:302016-10-13T03:06:10+5:30

संतप्त पालकांची पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार.

Late student was forced to clean the toilets! | उशिरा आलेल्या विद्यार्थ्यास शौचालय साफ करण्याची शिक्षा!

उशिरा आलेल्या विद्यार्थ्यास शौचालय साफ करण्याची शिक्षा!

लोणार , दि. १२- शाळेत येण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याकडून शाळेतील शौचालयाची स्वच्छता करून घेतल्याचा खळबळजनक प्रकार नगर पालिकेच्या काटेनगरातील उर्दू पूर्व माध्यमिक शाळेत १0 ऑक्टोबर रोजी घडला. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी मुख्याध्यापकाची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नगर पालिकेच्या उर्दू पूर्व माध्यमिक शाळेच्या इयत्ता ७ वीत शिक्षण घेणारा शे. रेहान शे.उस्मान या विद्यार्थ्यास काही कारणास्तव शाळेत येण्यास उशीर झाला. शाळेत पोहोचला त्यावेळी राष्ट्रगीत सुरू असल्याने शे. रिहान हा फाटकाबाहेर थांबला. राष्ट्रगीत संपल्यानंतर शे. रेहान याने शाळेत प्रवेश करताच मुख्याध्यापक मुजाहिद यांनी त्याला थांबण्यास सांगून शाळेत उशिरा येण्याचे कारण विचारले. उशिरा आल्याबद्दल रेहानकडून शाळेतील शौचालय स्वत: उभे राहून स्वच्छ करून घेतले. सदर प्रकार विद्यार्थ्याने आपल्या पालकाजवळ कथन केल्यानंतर त्याचे वडील शे. उस्मान यांनी या प्रकाराबाबत मुख्याध्यापक मुजाहिद यांना विचारणा केली असता, विद्यार्थ्यांंनी शाळेत उशिरा येऊ नये, याकरिता शिक्षा केल्याचे सांगितले.
शौचालय साफ करून घेतल्याने रेहानची प्रकृती ढासळली असून, त्याला तापसुद्धा आला आहे. यामुळे सदर प्रकाराची सखोल चौकशी करून दोषी मुख्याध्यापकास सेवेतून निलंबित करण्याची मागणी शे.उस्मान शे.दाऊद यांनी निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जिल्हाधिकारी बुलडाणा, खासदार प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय रायमुलकर, मुख्याधिकारी न.पा. लोणार, तहसीलदार लोणार, प्रधान सचिव शालेय शिक्षण मुंबई यांच्याकडे केली आहे.

न.पा. उर्दू पूर्व माध्यमिक शाळा लग्न समारंभासाठी भाडेतत्त्वावर देण्यात येते. यावेळी शाळेतील शौचालयाचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो. हे शौचालय स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची असताना मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांंकडून स्वच्छ करून घेणे कितपत योग्य आहे?
- शे.उस्मान शे.दाऊद
पालक, लोणार

झालेल्या गंभीर प्रकाराबाबत चौकशीचा आदेश दिला असून, विद्यार्थ्याकडून शौचालय स्वच्छ करून घेतल्याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकास कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली आहे.
- विजय लोहकरे
मुख्याधिकारी न.पा. लोणार

Web Title: Late student was forced to clean the toilets!