टीवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांना दिली गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका
By Admin | Updated: November 21, 2014 02:26 IST2014-11-21T02:26:29+5:302014-11-21T02:26:29+5:30
आॅक्टोबर परीक्षेचा गोंधळ बुधवारीही सुरूच राहिला. टीवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांना ‘फायनान्स अकाउंटिंग’ या विषयाची गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका देऊन विद्यापीठाने गोंधळाची परिसीमाच गाठली.

टीवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांना दिली गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका
मुंबई : मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या आॅक्टोबर परीक्षेचा गोंधळ बुधवारीही सुरूच राहिला. टीवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांना ‘फायनान्स अकाउंटिंग’ या विषयाची गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका देऊन विद्यापीठाने गोंधळाची परिसीमाच गाठली. विद्यापीठाच्या सर्वच परीक्षा केंद्रांवर हा धक्कादायक प्रकार घडला. विद्यार्थ्यांकडून तक्रारी येताच विद्यापीठाने पेपर बदलून दिला. मात्र त्यामुळे परीक्षा तब्बल तासभर उशीराने सुरू झाली.
विधानसभा निवडणुकीमुळे विद्यापीठाने आॅक्टोबर परीक्षा पुढे ढकलली होती. त्यामुळे बीए, बीकॉम आणि बीएस्सीच्या परीक्षा ५ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या आहेत. बुधवारी दुपारी ३ वाजता टीवायबीकॉमच्या पाचव्या सत्राची ‘फायनान्स अकाउंटिंग’ या विषयाची परीक्षा सुरू झाली. मात्र प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर त्या गेल्या वर्षीच्या असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले आणि परीक्षा केंद्रांवर एकच गोंधळ उडाला.
युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. नरेश चंद्र यांची भेट घेऊन हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. यावर प्र-कुलगुरूंनी चौकशी करून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ऐन परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असल्याबद्दल सिनेट सदस्य व व्यवस्थापन परिषदेचे सदस्य महादेव जगताप यांनी विद्यापीठाच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)