मार्चचा शेवटचा आठवडा बँकांच्या सुट्यांचा
By Admin | Updated: March 17, 2015 01:38 IST2015-03-17T01:38:02+5:302015-03-17T01:38:02+5:30
पुढील आठवड्याच्या शनिवारपर्यंत अर्थात २८ मार्चपर्यंत आटोपून घ्या. कारण २९ मार्चपासून ते थेट ६ एप्रिलपर्यंत बँक सुरू असल्याचे चित्र अभावानेच पाहायला मिळेल.

मार्चचा शेवटचा आठवडा बँकांच्या सुट्यांचा
२८ मार्च ते ५ एप्रिल सुट्यांचा सुकाळ : आताच करा बँकिंग व्यवहाराचे नियोजन
मुंबई : तुम्हाला जर कुणाला काही धनादेश द्यायचे असतील अथवा अन्य कोणतेही बँकिंग व्यवहार करायचे असतील तर ते पुढील आठवड्याच्या शनिवारपर्यंत अर्थात २८ मार्चपर्यंत आटोपून घ्या. कारण २९ मार्चपासून ते थेट ६ एप्रिलपर्यंत बँक सुरू असल्याचे चित्र अभावानेच पाहायला मिळेल.
२८ मार्च रोजी शनिवार असल्यामुळे बँकांचे व्यवहार अर्धा दिवस होतील. त्यानंतर २९ मार्च रोजी रविवार असल्याने बँका बंद असतील. सोमवार, ३० मार्चला पूर्ण दिवस नियमित कामकाज होईल. मात्र त्यानंतर ३१ मार्च रोजी आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने सरकारी बँका ग्राहकांसाठी बंद असतील. परंतु केवळ ज्यांना करभरणा करायचा आहे, अशाच ग्राहकांसाठी काही विशेष काउंटर्स सुरू असतील. खासगी बँका मात्र ३१ मार्च रोजी ग्राहकांसाठी खुल्या राहतील. ३१ मार्च रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षाची सुटी ही १ एप्रिल रोजी असल्याने बँका पूर्णपणे बंद राहतील. त्यानंतर २ एप्रिल रोजी महावीर जयंती, ३ एप्रिल रोजी गुड फ्रायडे अशा सलग दोन सुट्या आहेत, तर ४ एप्रिलला पुन्हा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज अर्ध्या दिवसाचे असेल, तर ५ एप्रिल रोजी रविवार असल्याने पुन्हा बँका बंद राहतील. परिणामी,
६ एप्रिलपासून बँकांचे व्यवहार पूर्ववत होतील.
नेट बँकिंग, आॅनलाइन ट्रान्स्फर, रोख व्यवहारातही अडचण
च्नेट बँकिंगद्वारे जे आॅनलाइन ट्रान्स्फर व्यवहार होतील, त्यालादेखील खीळ बसेल. अन्य बँकांप्रमाणे भारतीय रिझर्व्ह बँकेलाही सुटीचे कॅलेंडर लागू असल्याने एनईएफटी व आरटीजीएसतर्फे जे व्यवहार होतात, त्याचे रिझर्व्ह बँकेच्या मध्यवर्ती सर्व्हरमधून क्लिअरिंग होणार नाही.
च्बँक सुट्यांच्या काळात ४८ तासांच्या आत एटीएममध्ये खडखडाट दिसून येतो. शनिवार,
२८ मार्च रोजी एटीएममध्ये पैशांचा भरणा झाल्यावर ३० व ३१ मार्चला पैशांचा भरणा होईल. त्यानंतर मात्र थेट ४ एप्रिल रोजी एटीएममध्ये पैसे भरले जातील. परिणामी, १ ते ४ एप्रिल या कालावधीमध्ये एटीएममध्ये खडखडाट असेल.