दोन वर्षात राज्यातील १२, ४३३ औद्योगिक कंपन्यांना टाळे
By Admin | Updated: March 21, 2016 17:24 IST2016-03-21T17:24:56+5:302016-03-21T17:24:56+5:30
राज्यात गेल्या दोन वर्षात तब्बल १२ हजार ४३३ औद्योगिक कंपन्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला असल्याची कबुली ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली.

दोन वर्षात राज्यातील १२, ४३३ औद्योगिक कंपन्यांना टाळे
मुंबई : राज्यात गेल्या दोन वर्षात तब्बल १२ हजार ४३३ औद्योगिक कंपन्यांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला असल्याची कबुली ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. मात्र याच कालावधीत तब्बल ३० हजार ३५२ नवीन औद्योगिक कंपन्यांना वीज पुरवठा सुरू करण्यात आला असल्याने महागड्या वीजदरामुळे उद्योग बंद झाल्याचा आरोप बावनकुळे यांनी फेटाळून लावला.
राज्यातील महागड्या वीज दरामुळे उद्योग परराज्यात जात असल्याबाबतचा तारांकित प्रश्न अनिल भोसले, किरण पावसकर, संदीप बाजोरिया आदी सदस्यांनी विचारला होता. राज्यातून २०१३-१४ मध्ये औद्यागिक ग्राहकांच्या वीज वापरात मोठ्या प्रमाणावर घट झाली असली तरी २०१४-१५ मध्ये औद्यागिक वीज वापरामध्ये ५.४८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महावितरण कंपनीचा औद्यागिक ग्राहकांसाठीचा वीजदर सर्वात कमी असल्याचा दावा उर्जा मंत्री बावनकुळे यांनी केला. औद्योगिक ग्राहकांसाठी टाटा पॉवर ८.४० रुपये प्रति युनिट तर रिलायन्स कंपनी ७.२७ रुपये प्रति युनिट इतका दर आकारते. यातुलनेत महावितरणचा दर ७.२१ रुपये असल्याचे त्यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.
वीज दर वाजवी राहावेत यासाठी महावितरणतर्फे दीर्घकालीन वीज खरेदी करार, संचालन व सुव्यवस्था खर्चावर नियंत्रण आदी प्रयत्न करण्यात येत आहेत. तर वीज उत्पादनासाठी लागणारा कच्चा कोळसा, वहन खर्चात बचत करून वीज दरात कपात तसेच वीज प्रणालीत सुधारणा व तूट कमी करण्याबाबत संबंधित कंपन्यांना सूचना देण्यात आल्याचेही बावनकुळे यांनी सांगितले.