दोन दिवसांत एसटीचे भारमानही घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2016 04:13 IST2016-11-12T04:13:52+5:302016-11-12T04:13:52+5:30
५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरच्या रात्री घेतला. या निर्णयामुळे देशभरात गोंधळ उडाला असून

दोन दिवसांत एसटीचे भारमानही घटले
मुंबई : ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरच्या रात्री घेतला. या निर्णयामुळे देशभरात गोंधळ उडाला असून, अनेकांकडे सुट्या पैशांची चणचण भासू लागली आहे. त्याचा मोठा आर्थिक फटका एसटी महामंडळालाही बसला. दोन दिवसांत प्रवाशांनी प्रवास टाळल्यामुळे महामंडळाचे भारमान ५ टक्क्यांहून अधिक कमी झाले. याच कारणामुळे पुढील दोन-तीन दिवसांत आणखी भारमान घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
५00 आणि १000 रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन खर्चावर चांगलाच परिणाम होऊ लागला. नोटा बंद करण्याचा निर्णय अचानक घेतल्याने अनेकांनी त्या बदली करण्यासाठी बँकांकडे धाव घेतली. मात्र लांबच लांब रांगा, तासन्तास लागणारा वेळ आणि मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने काही वेळातच संपणारी रक्कम यामुळे मोठा गोंधळ उडत आहे.
अनेकांकडे ५00 आणि १000च्या नोटा जरी असल्या तरी सुटे पैसे नसल्याने दैनंदिन खर्च करायचा कसा, असा सवाल उपस्थित झाला. त्यामुळे एखाद्या ठिकाणी गेल्यास छोट्या-मोठ्या खर्चाची समस्याही जाणवत आहे. या सर्व कारणांचा परिणाम राज्याची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी सेवेवरही झाला. महामंडळाने प्रवाशांकडून तिकिटांसाठी ५00 आणि १000 रुपयांच्या नोटा ११ नोव्हेंबरपर्यंत घेण्याच्या निर्णय घेतला. या नोटा जरी घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असला तरी प्रत्यक्षात सुट्या पैशांच्या चणचणीमुळे प्रवाशांनी लांब पल्ल्याबरोबरच स्थानिक पातळीवरील प्रवास करणेही टाळले असल्याचे समोर आले. त्याचा परिणाम एसटीच्या भारमानावर झाला.
एसटीचे दिवाळीदरम्यान ६५ टक्के असलेले भारमान १0 आणि ११ नोव्हेंबर या दोन दिवसांत ५ टक्क्याहून अधिक घसरले. महामंडळाचे भारमान हे प्रत्येक वर्षी दिवाळी संपल्यानंतरही पुढील काही दिवस असेच असते. त्यानुसार १४ नोव्हेंबरपर्यंत एसटीचे भारमान ६५ टक्क्यांपर्यंत राहिले असते. मात्र त्याआधीच भारमान घसरले. १४ नोव्हेंबरपर्यंत भारमान आणखी घसरण्याची भीती महामंडळाकडून व्यक्त केली जात आहे.
दोन दिवसांत भारमान घसरल्याने जवळपास ४ कोटींपेक्षा अधिक उत्पन्न बुडाले.
कार्तिकी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाने ७ नोव्हेंबरपासून टप्प्याटप्प्याने मुंबईसह अन्य ठिकाणांहून १५0 बसेस पंढरपूरसाठी सोडल्या. मात्र या बसेसचे आरक्षण आधीच झाल्याने अशा प्रवाशांना त्याचा फटका बसला नाही.
परंतु १0 नोव्हेंबर रोजी पंढरपूरला अन्य ठिकाणाहून जाण्यासाठी एसटी आगारात किंवा स्थानकात येऊन एसटी पकडणाऱ्यांची गर्दी मात्र कमी झाली.
टोलमाफी एसटीला तारणार
याच कारणांमुळे ९ नोव्हेंबरपासून सर्व वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. ही टोलमाफी १४ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. त्याचा फायदा एसटीला मिळत असून, दिवसाला ३५ लाख रुपयांची बचत होत आहे. भारमान जरी घटले असले तरी टोलमाफी एसटीला तारू शकते, अशी आशा व्यक्त केली जाते. महामंडळ वर्षाला १३0 कोटी रुपये टोल भरत आहे.