भीष्मराज बाम यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप
By Admin | Updated: May 13, 2017 13:55 IST2017-05-13T13:55:30+5:302017-05-13T13:55:30+5:30
ज्येष्ठ क्रीडा मनोसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या पार्थिवावर शनिवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

भीष्मराज बाम यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप
ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 13 - ज्येष्ठ क्रीडा मनोसोपचार तज्ज्ञ भीष्मराज बाम यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि. १३) शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत, धावपटू कविता राऊत, स्वाध्याय परिवाराच्या धनश्रीदीदी तळवलकर, निवृत्त सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बाम यांचे अंत्यदर्शन घेतले.
दरम्यान शनिवारी सकाळी महात्मानगर गणपती मंदिराच्या सभागृहात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. दुपारी १२ वाजता बाम यांच्या पार्थिवावर नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या पार्थिवावर पुत्र अभिजित यांनी अंत्यसंस्कार केले.
खेळाडूंमध्ये जिंकण्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण करणारे ज्येष्ठ क्रीडा मनोसोपचारतज्ज्ञ आणि राज्याचे निवृत्त अतिरिक्त पोलीस महासंचालक भीष्मराज बाम यांचे शुक्रवारी संध्याकाळी नाशिकमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. मानसोपचारातील भीष्म अशी उपाधी लाभलेले भीष्मराज बाम हे एका कार्यक्रमात योग विद्येसंदर्भात व्याख्यान देत असतानाच हृदयविकाराच्यातीव्र धक्क्याने कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
बाम हे नाशिक शहरातील महात्मानगर येथे वास्तव्यास होते. येथील महात्मा सभागृहात त्यांचे शुक्रवारी सायंकाळी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानात बोलत असताना ते खाली कोसळले. तातडीने त्यांना याच भागात असलेल्या सिक्स सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. डॉ. कुणाल गुप्ते यांनी त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी होऊ शकला नाही.
क्रीडामानसोपचार तज्ज्ञ म्हणून अवघ्या देशाला परिचित असलेल्या बाम यांनी क्रिकेटमधील विक्रमवीर सचिन तेंडुलकरसह ‘द वॉल’ राहुल द्रविड या जगभरातील महान क्रिकेटपटूंसह आॅलिम्पिक सुवर्णपदक विजेता अभिनव बिंद्रा यांची कामगिरी उंचावण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यांनाच नव्हे तर नेमबाज अंजली भागवत, सुमा शिरूर, गगन नारंग तसेच गीत सेठी, धावपटू कविता राऊत यांच्यासह शेकडो खेळाडूंना मानसिकदृष्ट्या एकाग्रता आणि अन्य प्रकारचे मार्गदर्शन करून त्यांची कामगिरी उंचावण्यासाठी सहकार्य केले. त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याची दखल घेऊन राज्य शासनामार्फत २०११-१२ या वर्षासाठीचा शिवछत्रपती पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.
भारतातील क्रीडापटूंना मानसिकदृष्ट्या सक्षम करण्याचे शिवधनुष्य बाम यांनी उचलले होते. बाम यांनी शासकीय खात्यातील सेवानिवृत्तीनंतर भारतीय योगशास्त्राचा अभ्यास केला आणि त्यातून क्रीडामानसोपचार या विषयावर प्रभुत्व मिळविले. ‘तुमचा तुमच्यावर विश्वास हवा, स्वत:वर विश्वास असल्यास काहीही शक्य आहे’, असे ते नेहमीच सांगत असत.
बाम यांनी राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या नेमबाजीसंघासह मुंबई रणजी संघाचे मानसोपचार सल्लागार म्हणून काम पाहिले होते. विजयाचे मानसशास्त्र, मना सज्जना ही त्यांची पुस्तकेही गाजली होती.आज ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्वल केले अशा खेळाडूंपैकी अनेकांनी भीष्मराज बाम यांचे मार्गदर्शन घेतले होते.
खेळाडू कितीही प्रतिभाशाली असला तरी, मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी त्याच्यामध्ये एक मानसिक कणखरता लागते. हाच गुण भीष्मराज बाम यांनी खेळाडूंमध्ये विकसित केला. त्यांना जिंकायला शिकवले. राहुल द्रविडचा समावेश आज यशस्वी खेळाडूंमध्ये होतो. पण हाच द्रविड 1999 साली चाचपडत असताना त्याने भीष्मराज बाम यांचे मार्गदर्शन घेतले होते. त्यानंतर द्रविडने कधी मागे वळून बघितले नाही. फक्त क्रिकेटपटूच नव्हे नेमबाज अंजली भागवत, धावपटू कविता राऊत यांनाही भीष्मराज बाम यांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला.