मयूरेशला मायणीकरांचा अखेरचा निरोप
By Admin | Updated: February 4, 2015 01:51 IST2015-02-04T01:51:36+5:302015-02-04T01:51:36+5:30
खेळाडू मयूरेश भगवान पवार याच्यावर चाँद नदीच्या तीरावरील कैलास स्मशानभूमीमध्ये मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

मयूरेशला मायणीकरांचा अखेरचा निरोप
मायणी (जि. सातारा) : मायणी, ता. खटाव येथील राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू मयूरेश भगवान पवार याच्यावर चाँद नदीच्या तीरावरील कैलास स्मशानभूमीमध्ये मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी परिसरातील
हजारो ग्रामस्थ व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
तिरुवअनंतपुरम् (केरळ) येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने मयूरेशचे सोमवारी निधन झाले. त्याचे पार्थिव आज मायणी येथे आणण्यात आले. राज्य नेटबॉल असोसिएशनतर्फे केरळ येथे नेटबॉल स्पर्धेसाठी मयूरेश महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत होता.
केरळ येथून मंगळवारी ११ वाजून ४० मिनिटांनी मयूरेशचे पार्थिव विमानाने मुंबई येथे आणण्यात आले. त्या ठिकाणी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे व माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी आदरांजली वाहिली. तेथून रुग्णवाहिकेतून पार्थिव मायणी येथे सायंकाळी ७.२५ला आणण्यात आले.
चाँद नदीच्या काठावर मयूरेशचे घर असल्यामुळे नदीच्या दोन्ही बाजूंस तसेच मराठी शाळा आणि चांदणी चौकामध्ये दिवसभर मयूरेशच्या पार्थिवाची वाट पाहत हजारो ग्रामस्थ, क्रीडापे्रमी व मित्रमंडळी वाट पाहत होते. कैलास स्मशानभूमीच्या रस्त्याची स्वच्छता करण्यात आली होती. अंत्यविधीस आमदार जयकुमार
गोरे, सुरेंद्र गुदगे, तहसीलदार
विवेक साळुंखे, क्रीडाधिकारी उदय जोशी, सुधाकर कुबेर, डॉ. एम.आर. देशमुख आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर व मायणी ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)